नाना पटोले आणि मोदी एकाच मंचावर, गावगुंड मोदीला नानांचं निमंत्रण?
आता नाना पटोले आणि गावगुंड मोदी पुन्हा एकत्र आले. त्यामुळं चर्चा तर होणारच...
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरमध्ये काँग्रेसतर्फे रोजगार मेळावा झाला. हा मेळावा चर्चेचा विषय ठरला. त्याचं कारण काही वेगळंच होतं. या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि गावगुंड मोदी एका व्यासपीठावर दिसले. त्यामुळं लोकांच्या भुवया उंचावल्या. मध्यंतरी गावगुंड मोदीला शिव्या दिल्याचं नाना पटोले म्हणाले होते. मोदीला मी मारू शकतो, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते या गावगुंड मोदीबद्दल म्हणाल्याचं नंतर पटोले म्हणाले होते. तोच गावगुंड मोदी काँग्रेसच्या मेळाव्यात मंचावर दिसला. तेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत.
भंडारा जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जेवणाळा येथे एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “आपण मोदीला मारू शकतो आणि शिवा देऊ शकतो असा उच्चार केला होता. हा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर नाना पटोले यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होऊ लागला होता.
दरम्यान, नाना पटोले यांनी आपण लोकांना त्रास देणाऱ्या गावगुंड उमेश घरडे ज्याला मोदी म्हणतात त्याबाबत असा उच्चार काढल्याचा खुलासा केला. काही दिवस प्रकरण तापलं. पण, त्यानंतर या प्रकरणावर पडदा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लाखांदुरात रोजगार मेळावा
अचानक गावगुंड मोदी जिल्ह्याबाहेर गायब झाला. चर्चेला उधाण आल्यानंतर काल लाखांदुरात काँग्रेसतर्फे रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तेही चक्क व्यासपीठावर गावगुंड मोदी उपस्थित होता. त्यामुळं पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला उधाण आले.
आपण गावगुंड मोदीला निमंत्रण दिले नव्हते. असा खुलासा नाना पटोले यांनी केला. आपण नाना पटोले यांना भेटण्यास आल्याचे गावगुंड मोदी उर्फ उमेश गरडे यांनी म्हटलं.
एकाच व्यासपीठावर नाना आणि मोदी एकत्र दिसले. पुन्हा एकदा बहुचर्चित जुन्या प्रसंगाची आठवण झाली आहे. नाना पटोले म्हणाले, मी या गावगुंड मोदीला काही आमंत्रण दिलं नाही. मी कार्यक्रमात उपस्थित होतो. तोही कार्यक्रमात आला असेल.
उमेश गरडे म्हणाला, मी कार्यक्रमात आलो. ते नाना पटोले यांना भेटायला. नानांनी मारण्याची भाषा केली होती. त्यावेळी मी नशेत असल्याचं स्पष्टीकरण या गावगुंड मोदीनं दिलं होतं. त्यामुळं प्रकरण आटोक्यात आलं. आता नाना पटोले आणि गावगुंड मोदी पुन्हा एकत्र आले. त्यामुळं चर्चा तर होणारच…