माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती (Nana Patole Maharashtra Congress President)
मुंबई : सर्व तर्कवितर्कांनंतर अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची वर्णी लागली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष तर त्यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे. (Nana Patole elected as New Maharashtra Congress President)
नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अध्यक्ष कोण?
1. शिवाजी मोघे (यवतमाळ) 2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद) 3. नसीम खान (मुंबई) 4. कुणाल पाटील (धुळे) 5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई) 6. प्रणिती शिंदे (सोलापूर)
काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?
1. शिरीष चौधरी (जळगाव) 2. रमेश बागवे (पुणे) 3. हुसैन दलवाई (मुंबई) 4. मोहन जोशी (पुणे) 5. रणजीत कांबळे (वर्धा) 6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद) 7. बी. आय. नगराळे 8. शरद अहेर (नाशिक) 9. एम. एम. शेख (औरंगाबाद) 10. माणिकराव जगताप (रायगड)
राहुल गांधींची भेट
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ आल्याचे बोलले जात होते.
नाना पटोले यांचा राजीनामा
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला होता. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केल्यानंतर पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली.
Nana Patole has been appointed as the President of Maharashtra Pradesh Congress Committee. (File photo) pic.twitter.com/YdbnalZ5hU
— ANI (@ANI) February 5, 2021
अमित देशमुखांच्या नावाची केवळ चर्चाच
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र रात्रीतून नव्या राजकीय चर्चा सुरु होत्या. यामध्ये लातूरचे विद्यमान आमदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळेल अशी चर्चा होती, मात्र ही केवळ चर्चाच असल्याचं आता सिद्ध झालं आहे.
संबंधित बातम्या :
पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंना ना ना? अमित देशमुखांचं नाव चर्चेत, काय घडतंय पडद्याआड?
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?
(Nana Patole elected as New Maharashtra Congress President)