Nana Patole : मध्यावधी होतील पण शिवसेनेचा कार्यक्रम झाल्यावरच..! पटोले यांनीच सांगितली भाजपाची रणनिती
सध्याच्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाची जी रणनिती आहे त्यामधून तर शिवसेना संपवायची ही भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे शिवसेना चिन्ह राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये असा प्रयोग भाजपाने केला आहे. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतील असे चित्र आहे.
मुंबई : (BJP) भाजपा आणि शिंदे गटाच्या माध्यमातून सरकारची स्थापना होताच आता मध्यावधी निवडणुका लागतील असा सूर (MVA) महाविकास आघाडी सरकारमधून निघत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी याबाबत विधान केले असले तरी कॉंग्रेसचे (Nana Patole) नाना पटोले यांनी मात्र, भाजपाची रणनिती आणि शिवसेनेची होत असलेली स्थिती सांगून मध्यावधीबाबत विधान केले आहे. भाजपाने केवळ या सरकार स्थापनेचा विचार करुनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले असे नाहीतर यामागे मोठे नियोजन असल्याचे पटोले म्हणाले. शिवाय ज्या पध्दतीने सध्या भाजपाची रणनिती आहे त्यानुसार तर शिवसेनेचा कार्यक्रमच होईल अशी स्थिती आहे. भाजपाला शिवसेनेचे अस्तित्वच संपवायचे आहे असेच सध्याचे चित्र असून त्यानंतरच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. त्यामळे मध्यावधी निवडणुकांना घेऊन कॉंग्रेसनेही यामध्ये आपला सूर आवळला आहे.
शिवसेना संपवायची हाच भाजपाचा ‘प्लॅन’
सध्याच्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाची जी रणनिती आहे त्यामधून तर शिवसेना संपवायची ही भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे शिवसेना चिन्ह राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये असा प्रयोग भाजपाने केला आहे. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतील असे चित्र आहे. ही सर्व प्रक्रिया आणि शिवसेनेचा कार्यक्रम करायला आणखी 5 ते 6 महिने लागतील आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
बहुमत सिध्द करणे ही केवळ औपचारिकता पण…
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सर्वकाही स्पष्ट झाले आहे. शिवाय एकनाथ शिंदे याच्या गटाला आता मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाचे बहुमत सिध्द होणार यामध्ये आता काही नवीन राहिले नाही. बहुमत तर सिध्द होणार आता केवळ औपचारिकता राहिले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. पण त्यानंतर सरकारची खरी परीक्षा असणार आहे. राज्यातील परस्थिती पावसाने दिलेली ओढ, शेतकऱ्यांवरील संकट याचा निपटारा करताना सरकारचे कसब पणाला लागणार असल्याचे पटोले म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकारला पत्र
विधानसभेत बहुमत सिध्द होईल मात्र, त्यानंतर सरकारची खरी परिक्षा सुरु होणार आहे. कारण राज्यात जुलै महिना उजाडला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी होऊनही खरीप संकटात आहे. शिवाय अनेक जिल्ह्यामध्ये खत, बियाणांचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पेरणी करुनही नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करुन मदत मिळावी व खत, बियाणांचा पुरवठा केला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.