खरे देशप्रेमी असाल तर…. भाजप, राज ठाकरेंना नाना पटोलेंचं आव्हान काय?
इंग्रज कुणाला पेंशन देतील? स्वातंत्र्यवीराला तर देणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं वैचारिक चर्चा करा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
मुंबईः खरे देशप्रेमी असाल तर सावरकरांच्या ज्या पत्रावरून वाद होतोय, त्यावर बसून एकदा चर्चा करा, पत्राचं उत्तर द्या, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांना केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांकडून पेंशन घेत होते, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केल्यानंतर भाजप आणि मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. मात्र सावरकर (Savarkar) यांनीच लिहिलेले पत्र दाखवत काँग्रेस नेत्यांनी भाजपाला प्रश्न विचारला आहे.
नाना पटोले म्हणाले, ‘ सावरकरांबद्दल आम्ही कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत. हे पत्र इंग्रजांना लिहिलेलं होतं. मी तुमच्याकडे नोकर म्हणून काम करायला तयार आहे, अशा आशयाचं ते पत्र आहे. एकदा नाही अनेकदा लिहिलं आहे.
60 रुपये महिना त्यांना पेंशन मिळत होती. आता इंग्रज कुणाला पेंशन देतील? स्वातंत्र्यवीराला तर देणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं वैचारिक चर्चा करा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी, प्रियंका सहभागी होणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रात 6 कमिशनर हेड आहेत तिथे 6 सभा घेणार असून या सभांना सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित असतील, असं नाना पटोले म्हणाले.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने संविधान आणि तिरंग्याला वाचवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे हा संदेश महाराष्ट्रातून देशात गेल्याचं नाना पटोले म्हणाले. त्यामुळे भारत जोडो यात्रेता परिणाम म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन नक्कीच होणार. तसे वारेही वाहू लागले आहे. येथे लोक पैसे दऊन आणलेले नाहीत, असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं.