शिवसेना-भाजप महायुतीत लढलेल्या घटकपक्षाने साथ सोडली, नवा मित्र ठरला?
पहिल्यांदा राजकीय भूमिका घेत एप्रिल 2019 मध्ये शिवा संघटनेने शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला (Nanded Shiva Sanghatna break alliance)
नांदेड : गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवा संघटनेने दोन्ही पक्षांची साथ सोडल्याची घोषणा केली आहे. अवघ्या दोन वर्षांतच शिवा संघटनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे सर्व पक्षांशी चर्चा करुन राज्य पातळीवर पुढील निर्णय घेण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. (Nanded Shiva Sanghatna announces to break alliance with Shivsena BJP)
शिवा संघटनेची घोषणा
वीरशैव लिंगायत समाजाची संघटना असलेल्या शिवा संघटनेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन नांदेडमध्ये पार पडलं. या अधिवेशनाला राज्यभरातून शिवा संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. याच अधिवेशनात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी संघटनेची नवीन राजकीय भूमिका जाहीर केली.
दोन वर्षात युतीतून बाहेर
शिवा संघटनेने राज्यात 25 वर्षांचा संघर्ष केला आहे. ओबीसी आरक्षणापासून महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा दिल्लीच्या संसद भवनात आणि लंडनमधील पार्लमेंटसमोर मांडण्यापर्यंत हजारो विषय संघटनेने निकाली काढले. त्यानंतर पहिल्यांदा राजकीय भूमिका घेत एप्रिल 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं मनोहर धोंडे यांनी सांगितलं.
पुढील वाटचाल ठरली
दोन वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपसोबत युती करण्याबाबत घेतलेला निर्णय रद्द झाल्याचं जाहीर करत आहोत. इथून पुढे सर्व पक्षांशी चर्चा करुन समाज हिताचा, संघटनेच्या हिताचा विचार करुन राजकीय वाटचाल ठरवू. भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी असा कुठलाही पक्ष असेल, सर्वांशी चर्चा करुन राज्य पातळीवर आगामी राजकीय भूमिका ठरवू, असं मनोहर धोंडे यांनी स्पष्ट केलं.
लिंगायत समाजात मोठा जनाधार असलेली एक मोठी संघटना म्हणून शिवा संघटनेची राज्यात ओळख आहे. त्यामुळे शिवा संघटनेच्या नव्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
नांदेडमध्ये शिवसेनेकडून अशोक चव्हाणांना धक्का, 17 पैकी 16 जागांवर भगवा फडकवला
ग्रामपंचायतीत धक्का, अशोक चव्हाण नांदेडमधील सर्वात महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मैदानात
(Nanded Shiva Sanghatna announces to break alliance with Shivsena BJP)