नारायण राणेंना अटक, अनिल परबांचा व्हिडीओ उजेडात; आता भाजप नेत्यांचा शिवसेनेला इशारा
परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा एक फोनवरील संवाद साधतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यात ते पोलिसांना बळाचा वापर करण्याची सूचना देताना दिसत आहेत. अनिल परबांच्या या व्हिडीओवरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिलाय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय. राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्या अटकेमागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अटकेवेळी रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी स्वत: आपल्यावर मोठा राजकीय दबाव असल्याचं सांगत आहेत, असं रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा एक फोनवरील संवाद साधतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यात ते पोलिसांना बळाचा वापर करण्याची सूचना देताना दिसत आहेत. अनिल परबांच्या या व्हिडीओवरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिलाय. (Video of Anil Parab’s phone conversation, Chandrakant Patil, Ashish Shelar’s warning to ShivSena)
‘सरकार सोडा आणि उतरा रस्त्यावर मग बघा काय करायचं ते’
‘भाजपची प्रतिमा मलिन होण्याचा काही संबंधच नाही. एका थोबाडीत मारल्यानंतर दुसरं थोबाड पुढे करायचं अशी अपेक्षा आहे का? टाळी एका हाताने वाजत नाही. पार्टी विथ डिफरन्सचा अर्थ हा नाही की, कुणी काही करा आपण मात्र टाळ्या वाजवत वा वा करत बसायचं. पार्टी विथ डिफरन्स तेच आहे की आम्ही अन्याय सहन करणार नाही. ही दंडुकेशाही चाललेली आहे. अनिल परब यांचा एक व्हिडीओ टीव्ही 9 च्या कॅमेरात कैद झाला आहे. त्यात ते म्हणत आहेत की असं कसं ऐकत नाहीत, बळाचा वापर करा. अरे… काय चाललंय काय? पोलिसांच्या सहाय्याने चाललंय का? सरकार सोडा आणि उतरा रस्त्यावर मग बघा काय करायचं ते’, असा इशाराच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.
‘तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत’
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजपच्या कार्यालयाजवळ तमाशे चालू राहिले तर भाजप महाराष्ट्रभर तांडव करेल आणि त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील. त्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपही व्हायरल झाली आहे. तालिबानींपेक्षाही भयंकर असं हे दिसतंय. मुळात राणे साहेबांनी स्वत: सांगितलं गुन्हा केला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत. सगळ्या सीडी महाविकास आघाडी नेत्यांच्या आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते एकमेकांवर गुन्हे दाखल करतील’, असा सूचक इशाराही शेलार यांनी दिलाय.
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE : नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?
Video of Anil Parab’s phone conversation, Chandrakant Patil, Ashish Shelar’s warning to ShivSena