पिंजरे में पोपट बोले.. अशी संजय राऊतांची अवस्था, शिंदे गटाचा आणखी एक शाब्दिक बाण
ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेला आहे, त्यांच्या बाजूला मग कसे बसतात? असा सवाल राऊत यांना विचारण्यात आलाय.
ठाणेः संजय राऊत (Sanjay Raut) यांची अवस्था सध्या पिंजरे में पोपट बोले.. या हिंदी गाण्यासारखी झाली आहे. 40 आमदारांच्या (Shivsena MLA) नावाने खडे फोडतात. कुडमुड्या ज्योतिष्यासमोर कार्ड ठेवलेले असतात. त्यापैकी एक कार्ड उचलतो आणि तो बोलतो. संजय राऊतही रोज सकाळी उठतात. 40 कार्डपैकी काही कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात, अशी जहरी टीका शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊतांवर ही बोचरी टीका केली आहे.
शिंदे गटातील आमदारांना गद्दार संबोधलं जातं. यावरून नरेश म्हस्के यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, मुळात गद्दार कोणाला म्हणतात काँग्रेसमधून शरद पवार साहेब बाजूला झाले.. ते काँग्रेसचे खासदार होते… काही लोक काही लोक घेऊन बाजूला झाले. मग शरद पवार साहेबांच्या पण कपाळावर गद्दर लिहिलय का? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांच्यावरूनही नरेश म्हस्के यांनी प्रश्न उपस्थित केलाय. ते म्हणाले, ‘ भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय.. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेला आहे, तुम्हाला दिसला असेल ते त्यांच्या बाजूला मग कसे बसतात? प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेस मधून तुमच्याकडे आल्या त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेला आहे…
सचिन अहिरही तसेच… किती जणांची नावे घेऊ ज्यांना तुम्ही आमदार केलं त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेले दिसले नाही का? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केलाय.
संजय राऊत यांच्यावर अधिक आक्रमक टीका करताना नरेश म्हस्के म्हणाले, तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि रिंगणात उतरा. उगाच तोंडाची हवा घालवू नका..