Nashik : नाशिकचे नगरसेवक शिवसेनेसोबतच; आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार?
शिवसेनेचे नाशिकमधील नगरसेवक आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणर आहेत. कुणी कुठेही गेलं तरी आम्ही शिवसेनेसोबतच असणार आहोत, असे या नगरसेवकांनी म्हटले आहे.
नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला गळती लागली आहे. नगरसेवकांपासून ते खासदारापर्यंत अनेक जण शिवसेनेला (shiv sena) सोडून शिंदे गटात सामील झाले आहे. एवढेच नव्ह तेर आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा देखील शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आमदारांच्या एका मोठ्या गटाचा त्यांना पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर काही शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे आणि भिवंडी येथील शिवसेनेच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नाशिकमधील (Nashik) नगरसेवक आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणर आहेत. कुणी कुठेही गेलं तरी आम्ही शिवसेनेसोबतच असणार आहोत, असे या नगरसेवकांनी म्हटले आहे.
सकाळी 11 वजता घेणार भेट
नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वजता हे नगरसेवक उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. राज्यभरात सध्या शिवसेनेमध्ये पडझड सुरू आहे. मात्र याही परिस्थितीमध्ये नाशिकचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा विश्वास हे नगरसेवक आपल्या पक्षनेतृत्वाला देणार आहेत. शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी पदाधिकारी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार हे सध्या शिंदे गटात आहेत. असे असतानाही आम्ही कायम शिवसेनेसोबत आहोत, असा विश्वास हे नगरसेवकर आज उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेने नेते संजय राऊत यांनी देखील नाशिक दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
राज्याच्या विविध शहरांमधील महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर देखील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेनेला एकामागू एक धक्के बसत आहेत. शिवसेनेमध्ये सुरू असलेली गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. अशा परिस्थितीमध्ये आता नाशिकचे नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये महापालिका निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.