नाशकात नवा ट्विस्ट, सत्यजित तांबेंनी काँग्रेस सोडली? सोशल मीडिया प्रोफाइल काय सांगतंय?
निवडणुकांच्या डावपेचांसाठी भाजप नेते गिरीश महाजन नाशकात तळ ठोकून आहेत. मात्र अखेरचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
मनोज गाडेकर, नाशिकः नाशिकच्या (Nashik) पदवीधर मतदार संघ निवडणुकीत दिवसेंदिवस नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तांबे पिता पुत्रांनी काँग्रेसला विश्वासात न घेता निवडणुकीत महत्त्वाचा निर्णय घेतल्याने पक्षनेतृत्व तोंडावर आपटल्याचं चित्र आहे. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. वडिलांनंतर मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यावरही काँग्रेस कारवाई करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असताना मोठी घडामोड समोर आली आहे. सत्यजित तांबे यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. सत्यजित तांबे यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून त्यांनी पक्षाचं नाव आणि लोगो दोन्ही काढून टाकल्याचं दिसून येतंय.
आतापर्यंत काय घडलं?
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला असतानाही ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ऐनवेळी पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस नेतृत्वाला अंधारात ठेवून दगाफटका केल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांच निलंबन केलं तर सत्यजीत तांबे यांच्याही निलंबनाचे संकेत मिळत आहेत. मात्र पक्षनेतृत्वाच्या कारवाईच्या आधीच सत्यजीत तांबेच काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे.
त्यांनी सोशल मिडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकलाय.. त्यामुळे सत्यजितने काँग्रेसला राम राम केला का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय…याशिवाय, सत्यजित तांबे यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश झळकत आहे. त्यावरून त्यांचा निर्णय पक्का झालाय की काय अशी चर्चा आहे.
कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं…
सत्यजित तांबे यांच्या प्रोफाइलवर एक वाक्य झळकतंय. ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’ असा मजकूर या संदेशात आहे. या माध्यमातून सत्यजीत तांबे पदवीधर मतदार आणि सामान्य जनतेला साद घालताना दिसत आहेत. आता त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार हे पाहावे लागेल.
भाजपाचा पाठिंबा कुणाला?
सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपाकडे ते पाठिंबा मागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत सूचक वक्तव्ये केली आहे. मात्र भाजपाचा पाठिंबा नेमका कुणाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणुकांच्या डावपेचांसाठी भाजप नेते गिरीश महाजन नाशकात तळ ठोकून आहेत. मात्र अखेरचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
मविआचा उमेदवार शुभांगी पाटील?
दरम्यान, निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांनी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. कोणत्याही पक्षाने त्यांना एबी फॉर्म न दिल्याने हा निर्णय़ घेतला. सत्यजित तांबे यांनी वेगळा निर्णय घेतल्याने शुभांगी पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मागितला. ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा दिला. आता महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांनी पाठिंबा देणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.