सत्यजित तांबे यांचा गौप्यस्फोट! नाना पटोलेंवर गंभीर आरोप, नाशिकच्या ABफॉर्मवरून मोठा खुलासा, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काय घडलं? वाचा सविस्तर…
एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा?, असा सवाल सत्यजित तांबे यांनी केलाय.
नाशिकः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघातील नाट्यमय घडामोडींनी आता गंभीर रुप घेतलंय. ज्या सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून नाना पटोले यांनी नाराजी दर्शवली होती. त्याच तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेस नेतृत्वावर मोठा आरोप केलाय. पक्षात, संघटनेत मला संधी मिळावी, यासाठी मी वारंवार मागणी केली. मात्र मला संधी नाकारली. वडिलांच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं. अखेर आम्ही तो निर्णय घेतल्यानंतरही प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म (AB Form) पाठवण्यात आले. त्यामुळेच ऐनवेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला, असं सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
काँग्रेसला विश्वासात न घेता तांबे पिता-पुत्रांनी हा निर्णय घेतल्याचं आतापर्यंत सांगण्यात आलं. मात्र पडद्यामागे नेमकं काय घडत होतं, याबद्दल सत्यजित तांबे यांनी प्रथमच खुलासा केलाय. पत्रकार परिषदेत सत्यजित तांबे यांनी या संपूर्ण घडामोडी कशा प्रकारे घडल्या याबद्दल सविस्तर सांगितलं..
दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म, काय घडलं?
- वडील डॉ. सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी निवडणूक लढवणार असा आम्ही निर्णय घेतला. त्यानंतरही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून दोन वेळेला चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
- ९ जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून प्रदेश कार्यालयाला संपर्क केला. त्यानुसार १० तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो बसून राहिला.
- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. दोन एबी फॉर्म घेऊन पाठवतोय. विधान परिषदेचे एबी फॉर्म असल्याने ते सीलबंद होते.
- 11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकिट फोडलं तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं समोर आलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते.
- एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म असल्याचं कळलं.. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा?, असा सवाल सत्यजित तांबे यांनी केलाय.
दुसऱ्यांदाही मोठी चूक..
सत्यजित तांबे म्हणाले, मला भाजपकडून निवडणूक लढायची होती तर हे एबी फॉर्म चुकीचे आहेत, हे कार्यालयाला कळवलच नसतं. आम्ही 11 तारखेला कळवलंच नव्हतं. 12 तारखेला दुपारी दीड वाजता एबी फॉर्म आले. त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचं नाव होतं. पर्यायी उमेदवाराचं नावाच्या ठिकाणी नील होतं.
निवडणूक कोण लढवणार हे तांबे कुटुंबियांनी ठरवायचं होतं, हे वारंवार काँग्रेसकडून सांगण्यात येतंय. मग आम्ही स्वतः निर्णय दिला असताना, असे प्रकार का घडले, असा सवाल सत्यजित तांबे यांनी केलाय.