उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची आपली लायकी आहे का?; संजय राऊतांनी भाजप नेत्याला खडसावलं
Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : आधी स्वतःचा पक्ष काढा मग बोला, तेव्हा मी स्वतः तुमचा सत्कार करेल; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला संजय राऊतांनी सुनावलं
नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण भाजपच्या नेत्यांनी या शुभेच्छा देताना मात्र टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. भाजपच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावलं आहे.
कोण बावनकुळे? आपली लायकी आहे का उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची? आयत्या बिळावर रेघोट्या मारून काय टीका करताय, असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळेंना सुनावलं आहे.
आधी स्वतःचा पक्ष काढा. मग मी स्वतः तुमचा सत्कार करेल, असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळे यांना चॅलेंज दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो. आयुष्य मंगलमय राहो. शतायुषी होवो…, असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण पुढे आजच्या दिवशी सुद्धा विश्वगुरू यांच्याबद्दल त्यांनी चुकीची विधान केली आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्याला अल्झायमर म्हणतात. याआधी त्यांनी मोदींचा उल्लेख अनेकदा केला आहे. त्यांची प्रशंसा केली आहे. आता ते हे सगळं विसरलेत, असं म्हणत बावनकुळे यांनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. ठाकरेंचा मोठा चाहता वर्ग आहे. हे चाहते वाढदिवस साजरा करत असतात. पण रायगड जिल्ह्यातील घटनेमुळं यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजूंना मदत करा, असं संजय राऊत म्हणाले.
संसदेच्या अधिवेशनावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.संसद चालू नये ही सरकारची योजना आहे. मणिपूरनंतर आता मिझोराममध्ये लोक रस्त्यावर आले आहेत. नॉर्थ ईस्टची राज्य संवेदनशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयांना बगल देता येणार नाही. त्यांना सदनात येऊन बोलावंच लागेल, असं संजय राऊत म्हणालेत.
मोदींनी कोणी अडवाईज केलंय माहीत नाही.ही आग नॉर्थ ईस्ट ला वाढली तर आपण काही करू शकत नाही. त्यामुळं आज आम्ही काळा दिवस पाळणार आहोत. तुम्ही मणिपूरवर बोला बाकी विषयावर नंतर बोलू, अशीच आम्हा विरोधी पक्षांची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणालेत.