‘या’ दोन जागा ठाकरे गट लढवणार; मविआच्या दिल्लीतील बैठकीआधी संजय राऊत यांचा मोठा दावा
Sanjay Raut on Mahavikas Aghadi Jagavatap Meeting in Delhi : पंतप्रधानांबाबत कुणी चुकीचे शब्द वापरणं चूकच, पण लक्षद्वीप...; संजय राऊत यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा. महाविकास आघाडीच्या बैठकीआधी संजय राऊत नेमकं काय म्हणाले? कोणत्या जागांवर राऊतांनी दावा केला आहे.
संदिप राजगोळकर प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 09 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची राजधानी दिल्लीत आज महत्वाची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत महाराष्ट्रातील मविआच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीआधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई आणि ठाणे या दोन्ही जागा आम्ही लढत आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.
आज मविआची बैठक
राजधानी दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नाना पटोले अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. तर शिवसेना ठाकरेगटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.
बैठकी आधी राऊत म्हणाले…
महाराष्ट्रातील तीन पक्षाच्या जागा वाटपाच्या संदर्भात आज बैठक होणार आहे. महाराष्ट्रात तीनही पक्षाच्या जागावाटपाच्या बैठका झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात अडचण नाही. कॉंग्रेसबाबत देखील हीच स्थिती आहे. शिवसेनेने देखील 48 जागांची चाचणी केली आहे. आम आदमी पक्षाची आणि कॉंग्रेसची काल बैठक झाली, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
कॉंग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. त्यांच्यासोबत ही बैठक होत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि आम्ही उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर शिवसेनेने 23 जागा लढल्या होत्या. त्यात 18 जागा आम्ही जिंकलो होतो. संभाजीनगर ही जागा अगदी कमी फरकाने हरलो. मुंबई आणि ठाणे या दोन्ही जागा आम्ही लढत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
मोदींबाबत राऊत काय म्हणाले?
मालदीवमधील काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांमध्ये टिप्पण्या केल्या होत्या. पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मालदीवच्या तीन उपमंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणं चूकच आहे. मात्र, लक्षद्वीपची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणालेत.