“INDIA नाव वापरण्याचा विरोधकांना अधिकार नाही, INDIA म्हणजे मोदी हीच आमची भावना”
Shivsena MP Rahul Shewale on India Name : विरोधकांच्या आघाडीला देण्यात आलेल्या INDIA नावावर शिवसेना खासदाराचा आक्षेप; म्हणाले...
नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : देशातील प्रमुख विरोधी पक्षांची काल बंगळुरुमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत भाजपला आगामी निवडणुकांमध्ये हरवण्यासाठीची रणनिती ठरवली गेली. विरोधी पक्षांच्या या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं. त्यावर आता शिवसेनेच्या खासदाराने आक्षेप घेतला. INDIA हा शब्द विरोधी पक्षांना वापरण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बातचित केली.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकावर घणाघात केलाय. तसंच या आघाडीच्या नव्या नावावरही राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतला आहे.
INDIA नाव लावण्याचा विरोधकांना अधिकार नाही. INDIA म्हणजे मोदी ही आमची भावना आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.
बंगळुरुत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील हजर होते. त्यावर राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. हे सगळे पक्ष एकत्र झालेले पक्ष कुटुंबासाठी एक झाले आहेत. त्यांना कुटुंब, मुलबाळ वाचवण्यासाठी झाली होती. आमची बैठक देशासाठी होती, असं ते म्हणाले.
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 3 वाजता सर्वपक्षीय फ्लोअर लिडरची बैठक आहे. राजनाथ सिंग, पीयूष गोयल या बैठकीला असतील. जी विधेयकं मांडली जाणार आहेत. त्याचा टाइम स्लॉट आजच्या बैठकीत ठरवला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
NDA ची बैठक 5.30 वाजता होईल. त्यात NDA चा अजेंडा ठरवला जाईल. 2024 च्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने हे अधिवेशन महत्वाचं आहे. काल खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकील सुरुवात झाली आहे, असं आपण म्हणू शकतो. पुढच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदींना निवडून द्यायचं हा संकल्प आम्ही कालच केला आहे, असं ते म्हणाले.
मुंबई, महाराष्ट्राच्या महत्वाच्या मुद्यांचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कृषी संदर्भ, मराठी भाषा अभिजात दर्जा यावर देखील आम्ही प्रस्ताव द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असंही शेवाळे म्हणालेत.
समान नागरी कायदा देशात लागू होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर ही राहुल शेवाळे बोललेत. आम्ही यापूर्वीच त्याला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा तो अजेंडा होताच. तो आता पूर्ण होईल असं वाटतं. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी जे करतील त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं ते म्हणाले.