मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपची धाकधूक वाढली आहे. नवी मुंबईतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे गणेश नाईक समर्थक नगरसेवक स्वगृही परतण्याची शक्यता बळावली (Navi Mumbai BJP Corporators) आहे.
नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांनी काल बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मंत्रालयात अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असल्याने या भेटीला अधिक महत्त्व आहे.
प्रभागातील बदललेल्या परिस्थितीमुळे भाजप नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा धसका घेतल्याची चर्चा आहे. पाच जण शिवसेनेत तर सहा जण राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती आहे.
नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या गणेश नाईक यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवक भाजप सोडून वर्षभरातच राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.
दरम्यान, आमचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही. ‘फेव्हिकॉल’च्या जोडप्रमाणे सगळे मजबूत एकत्र आहेत. सर्व नगरसेवक भाजपसोबत आहेत. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे काही पदाधिकारी पब्लिसिटीसाठी अशी कामं करतात, असा दावा नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला होता.
महाविकास आघाडीची एकजूट
महापालिका निवडणूक ‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’ या पद्धतीने घेण्याविषयी महाविकास आघाडी सरकारने याआधीच निर्णय घेतला आहे. याआधी वॉर्ड स्तरावर आढावा बैठक घेण्यात आली होती. निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर सहकारी पक्ष एकत्रितपणे येऊन प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार देणार आहेत.
सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत संदेश देण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
बेलापूरचे भाजप आमदार गणेश नाईकांनी भाजपच्या 50 नगरसेवकांची नवी मुंबईतील क्रिस्टल हाऊस येथे गुप्त बैठक आयोजित केली होती. महाविकास आघाडीचा रथ रोखण्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. नाईक परिवारातर्फे युवा नेतृत्व करणाऱ्या सागर नाईक, वैभव नाईकला यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Navi Mumbai BJP Corporators