Navi Mumbai Municipal Election 2021 : नवी मुंबईत मतदारांची हेराफेरी, एका मतदाराचा भाव पाचशे रुपये!
मतदार याद्यांमधील फेरफारासाठी नावामागे पाचशे रुपये एवढा भाव दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्या चांगल्याच प्रकाश झोतात आल्या आहेत. प्रभागातील मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार टाकणे आणि योग्य मतदार काढणे, असा गंभीर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शिवाय मतदार याद्यांमधील फेरफारासाठी नावामागे पाचशे रुपये एवढा भाव दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. गणेश नाईक हे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी गंभीर आरोप केला आहे.(Ganesh Naik warns of agitation in Navi Mumbai voter list case)
राज्यात नवी मुंबईसह पाच महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात महापालिका अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. पालिका अधिकाऱ्यांकडूनच मतदार यादीत फेरफार केला जात असल्याची तक्रार नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा
मतदार याद्यांमध्ये अशाप्रकारे चुका केल्या गेल्या असतील तर त्या तातडीने सुधाराव्यात अन्यथा कार्यकर्त्यांसह महापालिकेला घेराव घालण्याचा इशाराही नाईक यांनी यावेळी दिलाय. शिवाय संबंधित प्रभाग अधिकारी, सहायक आयुक्त, आयुक्त, जिल्हाधिकारी, कोंकण आयुक्त विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. त्यावरही कारवाई न झाल्यास उच्च नायालयात धाव घेणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे. यापूर्वी शिवसेनेतील एक दाम्पत्य आरक्षणासाठी कोर्टात गेले होते. शिवाय संपूर्ण नवी मुंबईतील प्रत्येक यादीत पाचशे ते सहाशे बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे प्रभाग आरक्षण, प्रभाग रचना आणि याद्यांमध्ये पालिका अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
‘एसआयटी मार्फत चौकशी व्हावी’
या प्रकरणात भाजप आमदार आशिष शेलार यांनीही सरकारवर गंभीर आरोप केलाय. “सोसायटी आणि चाळीतील नावे दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे मतदार पसार करणे सुरु आहे. दुसरा प्रकार म्हणजे अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवायला गेल्यावर तक्रार घेतली जात नाही. म्हणजे हा कामचुकारपणा आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ पाहता याद्याच टूकार आहेत. म्हणजे त्यांनी एकप्रकारे मतदारांच्या अधिकारालाच नकार दिला असल्याचे चित्र आहे. मंत्रालयात एसी केबीनमध्ये बसून हे सारे केले जात आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी”, अशी मागणी शेलार यांनी केली.
भाजपच्या दाव्यानुसार नेमकं काय घडलंय नवी मुंबईत?
“नवी मुंबईत 111 प्रभागात एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे, अशा व्यक्तींची नावे इतर प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभागरचनेनुसार ज्या प्रभागात सोसायट्या / चाळी येतात त्या सोसायट्या आणि चाळीमधील मतदारांची नावे इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत”, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, आशिष शेलार यांचा सवाल
नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस द्या; गणेश नाईकांची महापालिकेकडे मागणी
Ganesh Naik warns of agitation in Navi Mumbai voter list case