नवी मुंबईत शिवसेना नगरसेवकाचा राजीनामा, भाजपात प्रवेश करणार
भाजप नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मूळ शिवसैनिक नाराज होते Navi Mumbai Shivsena Counselor Resigns
नवी मुंबई : ऐन नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसला आहे. तुर्भे मतदारसंघातील शिवसेना नगरसेवक राजेश शिंदे यांनी पक्षाला रामराम ठोकला. शिंदे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला. भाजपच्या आयारामांमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतुष्टता होती. (Navi Mumbai Shivsena Counselor Resigns)
नवी मुंबईमध्ये शिवसेनेत होत असलेल्या मेगाभरतीमुळे शिवसैनिक नाराज होते. भाजप नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद होती.
तुर्भे मतदारसंघातील नगरसेवक राजेश शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वमर्जीने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे.
‘प्रभाग क्र. 70 मधून राजेश शिंदे नवी मुंबई महानगरपालिका 2020 ची निवडणूक लढवणार आहेत’ अशी घोषणा राजेश शिंदे यांच्या फेसबुक पेजवरुन करण्यात आली आहे. मात्र पक्षाच्या नावाविषयी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शिंदेंच्या नेतृत्वात सर्व समर्थक लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांची ‘देवाण-घेवाण’ झाल्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. (Navi Mumbai Shivsena Counselor Resigns)
हेही वाचा : नवी मुंबईतील पाच भाजप नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला