“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची संपत्ती जपली नाही, पण शिंदेंनी टेन्शन घ्यायचं कारण नाही!”, राणा असं का म्हणाल्या?
खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. पाहा...
अमरावती : रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष ताजा असतानाच खासदार नवनीत राणा यांनी एक नवं विधान केलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती जपता आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूची माणसं. ही माणसंच उद्धव ठाकरे यांना जपता आली नाहीत”, असं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.
शिंदेंचं कौतुक
उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. न्यायालयात जेव्हा कागदपत्र सादर करण्याची वेळ आली तेव्हाही उद्धव ठाकरे ते कागदपत्र सादर करू शकले नाहीत.त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. कारण बाळासाहेबांची संपत्ती शिंदेंसोबत आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
महाराष्ट्रातीस सत्ता संघर्षावर आज सुनावणी झाली. यावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली गेली तेव्हा त्यांनी हे विधान केलंय.
सत्ता संघर्षाचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित नाही. पण मला एवढंच सांगायचंय की, येत्या काळात महायुती अशीच घट्ट राहील. शिंदे आणि फडणवीस असंच एकत्र राहून महाराष्ट्राच्या हिताचं काम करतील, असा विश्वास आहे.जनतेचे आशिर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे 2024 लाही युतीचीच सत्ता येईल, असं राणा म्हणाल्या.
शिंदे-फडणवीस सरकारमधील लोक नाराज असल्याचं ठाकरेगटाचे नेते म्हणताहेत. पण त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. कारण याआधीच ठाकरेंना सोडून आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. त्यामुळे आमच्या सरकारमधील आमदार नाराज आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे, असं राणा म्हणाल्या.