VIDEO: अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा गोंधळ
जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याची घटना पाहायला मिळाली.
अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याची घटना पाहायला मिळाली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे. अहमदनगरमध्येही मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात लोक प्रतिनिधींसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन बैठकीत आक्रमक रुप धारण केलं. बाळासाहेब थोरात नागरिकांचे प्रश्न ऐकूण घेत असताना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे देखील हजर होते (NCP Activist chaos in meeting of Balasaheb Thorat in Akole on Remdesivir).
‘मी काय चुकीचं बोलतो आहे’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा सवाल
संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आरडाओरडा सुरु केल्यानंतर बैठकीला उपस्थित लोकांनी त्याला शांत बसण्यास सांगितले. मात्र, मी काय चुकीचं बोलतो आहे असा प्रतिसवाल करत त्याने आपलं बोलणं सुरुच ठेवलं. अकोले तालुक्याला रेमडेसिवीर इंजेक्शन कमी का? असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता.
या गोंधळानंतर स्वतः आमदार किरण लहामटे यांनी या आक्रमक कार्यकर्त्याला खाली बसण्यास सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर या ठिकाणी उपस्थित इतर नागरिकांनी आम्हीही येथे समस्या मांडायला आलोय, आम्हाला आमचे प्रश्न मांडू द्या गोंधळ करु नका, असं मत व्यक्त केलं. मात्र, बैठकीतील गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर या कार्यकर्त्याला तेथून बाहेर काढून देण्यात आलं.
राष्ट्रवादीचे आमदार लहामटे यांनीही कार्यकर्त्यासमोर हात जोडले
संबंधित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्यावर संताप व्यक्त केला. यावर आमदार किरण लहामटे यांनी कार्यकर्त्यापुढे थेट हात जोडल्याचं पाहायला मिळालं.
“तुझं जितकं वय तितका माझं राजकारण आहे”
विशेष म्हणजे या प्रकाराने संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनी देखील या कार्यकर्त्याला चांगलंच सुनावलं. तुझं जितकं वय आहे तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाहीयेत का? असाही सवाल थोरातांनी त्याला विचारला. आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही, असंही त्यांनी सुनावलं.
हेही वाचा :
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊनसाठी सहकार्य करा : हसन मुश्रीफ
व्हिडीओ पाहा :
NCP Activist chaos in meeting of Balasaheb Thorat in Akole on Remdesivir