उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय बंगल्यावर आपल्या पक्षाच्या विद्यमान आमदारांना बोलावलं होतं. अजित पवारांच्या आदेशानुसार अनेक आमदारांनी देवगिरी बंगल्यावर जावून त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी आपल्या आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी आमदारांना एबी फॉर्म दिल्याची बातमी ताजी असतानाच आता अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत मुंबईतून कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. या यादीत सर्व मातब्बर नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पण नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे अजितदादा यांनी नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलिक यांना तिकीट मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.
अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही ही योजना आणल्याचं सांगत आहेत. त्यासाठीची पुरेशी तरतूद करण्यात आल्याचंही अजितदादा सांगत आहेत. मात्र 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत फक्त चारच महिलांना तिकीट देण्यात आलं आहे. आदिती तटकरे, सरोज अहिरे, सुलभा खोडके आणि निर्मला विटेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.
दरम्यान, आपल्यालाच तिकीट मिळावं म्हणून अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. अनेक नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून अजितदादा यांची भेट घेतली होती. यातील बहुतेकांना अजितदादांनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे भेट सफल झाल्याचा आनंद या इच्छुकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.