पडळकर म्हणाले ‘पवारांनी येडं पेरलं, खुळं उगवलं, आता हसन मुश्रीफांचं उत्तर
गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यांची विचारसरणीच वाईट आहे, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : “शरद पवार साहेबांची (Sharad Pawar) बदनामी करण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकरांना (BJP MLC Gopichand Padalkar) विधानपरिषदेची आमदारकी देऊन केलेली एक चाल आहे. त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले. पडळकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यांची विचारसरणीच वाईट आहे, असं उत्तर मुश्रीफांनी दिलं. आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गावागावात कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, अशा परिस्थितीत कोरोनामुक्त गावांची स्पर्धा कशी भरवता, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता. (NCP Leader Hasan Mushrif attacks on BJP MLA Gopichand Padalkar over comment on Sharad Pawar)
त्यावरुन हसन मुश्रीफांनी पडळकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं. तसंच शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिल्याचं मुश्रीफ म्हणाले.
भाजपच्या लोकांचं मूर्खपणाचं वक्तव्य
शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही या चंद्रकांत पाटलांच्या आरोपावर मुश्रीफांनी उत्तर दिलं, ते म्हणाले, “पवारसाहेब मुख्यमंत्री नाहीत आणि पंतप्रधानही नाहीत, त्यांच्यामुळे आरक्षण गेलं असं मूर्खपणाचं वक्तव्य भाजपचे लोक करत आहेत. शरद पवारांबद्दल बोलून स्वतःचं हस करून घेत आहेत”.
आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आरक्षण दिलं. पण 102 वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्याचे अधिकार आरक्षण संदर्भात काढून घेतले. आम्ही जास्त वकील ठेवले. मात्र 102 वी घटना दुरुस्ती झाली, त्यात शरद पवारांचा संबंध कुठून आला, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला.
फडणवीसांनी पाच वर्ष अशीच घालवली
फडणवीस साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हाच आयोग नेमण्याची गरज होती, पण पाच वर्ष त्यांनी अशीच घालवली आणि त्याचे परिणाम आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात समोर आले आहेत. त्याचे गंभीर परिणाम असे झाले की देशातील ओबीसी आणि एन टी आरक्षण गेलं, असं मुश्रीफ म्हणाले.
आता या सर्वांनी एकत्र येऊन केंद्रावर दबाव टाकला पाहिजे, घटना दुरुस्ती करून त्यांनी आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. हा सगळा चेंडू आता केंद्र सरकारकडे आहे. मोदी साहेबांच्या मनात असेल तर ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं मुश्रीफांनी सांगितलं.
ओबीसी, मराठा आरक्षण
आरक्षणप्रश्नी परवा बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल होते, महाधिवक्ता होते, महाविकास आघडीचे तिन्ही नेते होते. आता पुन्हा आयोग नेमून, जनगणना करुन ओबीसी आणि मराठा समाजला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघडी सरकार कटिबद्ध आहे, असं मुश्रीफ म्हणाले.
VIDEO : हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या
पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला
पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच : चंद्रकांत पाटील
(NCP Leader Hasan Mushrif attacks on BJP MLA Gopichand Padalkar over comment on Sharad Pawar)