महानंद गुजरातला विकलंय ! जय हो, महानंद की ! जितेंद्र आव्हाड संतापले; महानंदच्या दूधावरून राजकारण तापलं !
महानंदचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच मुद्यावरून आता राजकारण तापलं आहे. विरोधाकांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं.
मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याने वातावरण तापलं आहे. महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण तप्त झालं असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद आता एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र महानंद एनडीबीकडे जाणार असल्याने विरोधक संतापले आहेत.
महानंद डेअरीचा आता संपूर्ण कारभार गुजरातमधून चालवला जाणार आहे. याच मुद्यावरून विरोधक संतापले असून सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘ महानंद आता गुजरातला विकलंय ! जय हो, महानंद की ! ‘ असे लिहीत जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
जितेंद्र आव्हाड यांनी महानंद डेअरीच्या मुद्यावरून काल रात्री एक ट्विट केलं. ‘ मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो, महानंद की ! ‘ अशा खोचक शब्दांत आव्हाड यांनी या मुद्यावर टीका केली.
मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो, महानंद…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 21, 2024
संजय राऊत यांनीही सोडलं टीकास्त्र
याच मुद्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील उद्योग आता गुजरातकडे वळवले जात आहेत. आज उद्योग जात आहेत, उद्या मुंबईही गुजरातमध्ये नेली जाईल. हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा डाव आहे असा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं.
काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला, माहिती न घेता आरोप करण्याची पद्धत, विखे पाटलांनीही सुनावलं
दरम्यान दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंदच्या हस्तांतरणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक होणार आहे. पूर्वीच्या लोकांच्या गलथान कारभारामुळे कामगारांचा प्रलंबित राहिलेला पगार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 500 कामगारांना व्हीआरएस देण्याची प्रक्रियेवर बैठकीत चर्चा होईल. जळगाव दूध संघ देखील हस्तांतरित करण्यात आला होता तो आता नफ्यात आल्यावर परत मिळाला आहे. गुजरातला प्रकल्प देत असल्याची आमच्यावर टीका होते आहे, पण काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. माहिती न घेता आरोप करण्याची पद्धत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
महानंद डेअरी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महानंद डेअरीला वाऱ्यावर सोडले आहे. महानंदमध्ये काम करत असलेल्या जवळपास ९०० कर्मचाऱ्यांना सात महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे हे कर्मचारी सध्या तणावाखाली आहेत. महानंदा डेअरी एनडी डीबी कडे देण्याचा प्रस्ताव मंजूर होऊ नये अध्याप डेअरीचे व्यवस्थापन स्थानांतर झाले नाही शिवाय महानंद डेअरीने राज्य सरकारच्या भरोशावर कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार ५३० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, सरकारने अद्यापही यासाठी रक्कम उपलब्ध करून दिले नाही यामुळे डेरी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे लाडू सगळे आज कर्मचाऱ्यांकडून महानंदा डेअरीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून डेअरी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लवकरच आमरण उपोषण करू, असा इशारादेखील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.