आता गडावरुन कोणतंही राजकारण नाही, मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच नारायण गडावर
बीड जिल्ह्यातील गडांच्या विकासाची जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.
बीड : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांनी नारायण गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेतले. आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde Narayan Gad) यावेळी म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित होते.
सध्या माझ्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे गडाच्या विकासासाठी आता महंतांना कुठलीच मागणी करावी लागणार नाही. जिल्ह्यातील गडांच्या विकासाची जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. ‘आम्ही गडावर येऊन आशीर्वाद घेतले आहेत आणि आता या ठिकाणाहून राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात करणार आहोत’ असं धनंजय मुंडे ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले.
आम्हाला कोणालाही वाटले नव्हते की मी मंत्री होईन. मात्र आता मंत्री झालोय. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी आज नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद घेण्यापूर्वी रात्रीतून पालकमंत्रिपदाची घोषणाही झाली. आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी *भगवान गडावरील* तयारी pic.twitter.com/TSG2qurfme
— OfficeofDM (@OfficeofDM) January 9, 2020
गडावर जपून बोललं पाहिजे, दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं सांगत ‘मी पुन्हा येईन’ मात्र आशीर्वादासाठी नव्हे तर दिलेला शब्द पाळण्यासाठी, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. आम्ही जास्त होरपळलेले आहोत. संदीप क्षीरसागर यांचा काळ कमी होता. मात्र माझा काळ जास्त होता, असं सांगत ‘मी उतणार नाही मातणार नाही. घेतला वसा खाली कधी टाकणार नाही’ असा विश्वासही धनंजय मुंडे (Dhananjay Munde Narayan Gad) यांनी बोलून दाखवला.