राज ठाकरे जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार, महाराजांची भूमिका कोण साकारणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जागतिक स्तरावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केलेली. याबाबत राज ठाकरे यांना अमोल कोल्हे यांनी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न विचारला.
मुंबई : ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनोखी मुलाखत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपट बनवला तर कुणाला मुख्य भूमिकेत साकारताना पाहायला आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. बायोपिकसाठी त्या प्रकारचं व्यक्तीमत्व लागतं. माझ्या मते या देशात बायोपिक करता येऊ शकेल असं इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता दिदी यांच्यावर बायोपिक करता येईल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपण चित्रपट बनवत असल्याचं म्हटलं. त्यावर अमोल कोल्हे यांनी मिश्किल प्रकारे शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारेल? असा प्रश्न विचारला.
“हा प्रश्न अत्यंत स्वार्थाची किनार असलेला प्रश्न आहे. कारण आपण एक शिवभक्त आहात हे माहिती आहे. समोर एक कॉम्पिटिशन बसलेली आहे. तरीसुद्धा हा प्रश्न आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट यावा अशी आपलीसुद्धा इच्छा आहे. याबद्दल तुम्ही मागे एका मुलाखतीत म्हटलं होतं. तो चित्रपट आपण दिग्दर्शित करावं, अशीही इच्छा आहे. त्याचं काम कधी सुरु होणार? कारण वय होत चाललंय. त्यामुळे हा स्वार्थी प्रश्न असू शकतो”, असं अमोल कोल्हे मिश्किलपणे म्हणाले.
“चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. लिखाणाचं काम सुरु झालं. हा चित्रपट तीन भागात येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट असेल. आंतरराष्ट्रीय दर्जावरचेच लोकं या चित्रपटात काम करतील”, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, “म्हणजे यामध्येही बिटविन द लाईन आहे. एकतर ते मला आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे असं म्हणत आहेत आणि…”. अमोल कोल्हे यांचं वक्तव्य पूर्ण होण्याचं बाकी असतानाच राज ठाकरे म्हणाले, “नाही पण मी पण नाहीय. मी पण दिग्दर्शित करत नाहीय”.
अमृता फडणवीस यांचे प्रश्न, राज ठाकरे यांचे मिश्किल उत्तरे
अमृता फडणवीस : राजकारणी मंडळी खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करत आहेत. याला लोकं कंटाळले आहेत. यात मीडिया पुढाकार घेऊ शकते, असं तुम्हाला वाटतं का? नॉटी लोकांच्या घरी जाऊन प्रतिक्रिया घेणे बंद केलं पाहिजे का?
राज ठाकरे : मी यावेळी अनेकदा बोललोय की तुम्ही दाखवताय म्हणून ते बोलत आहेत. तुम्ही हे बंद केलं पाहिजे. पण त्यांचा शेवटी टीआरपीचा विषय असतो. मी टीआरपीचं काही करु शकत नाही.
अमृता फडणवीस : राजकारणत खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चाललं आहे. राहुल गांधी यांनी मोदीजींना मिठी मारली. मग डोळा मारला. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात माईक दिला आणि डोळा मारला. याबाबत आपला काय प्लॅन आहे?
राज ठाकरे : डोळे मारायचा काय प्लॅन? ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात. त्यांच्या काही गोष्टी राहून गेल्या असतील. त्यामुळे ते आता करत आहेत.
अमृता फडणवीस : मला न्यूज चॅनलवरुन कळतं. तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी शिवसेना तर तर कधी भाजपला टाळी देता. आता हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार?
राज ठाकरे : काय आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. तर आता मी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही.
अमृता फडणवीस : ते खूप लॉयल आहेत
राज ठाकरे : कारण काय, ते पहाटेच गाडी घेऊन करुणाकडे जातात. मग तुम्हाला कित्येकदा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंबरोबर असतात. कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. कुणाला भेटणं, बोलणं ही बातमी झालीय. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला. त्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कुणी कुणाला भेटलं तर युती आणि आघाडी होत नसतात.