आधी माहिती घ्या, मग आरोप करा, नाना पटोलेंवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावे, असं नवाब मलिक म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे.
माहिती घ्या, मग आरोप करा
नाना पटोलेंच्या या आरोपांना नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. मलिक म्हणाले, “नाना पटोले यांनी जे आरोप केलेत ते त्यांनी माहितीच्या अभावानं हे आरोप केले आहेत. कुठलंही सरकार असेल तरी अशा पद्धतीनं माहिती गृहखातं संकलित करत असतं. सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असते. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होतं. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने असे आरोप करत आहेत”, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.
नाना पटोलेंना वाटत असेल त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसं सांगावं, तसं पत्र गृहविभागाला द्यावं, असंही मलिक म्हणाले.
नाना पटोले काय म्हणाले होते?
नाना पटोले म्हणाले, “त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे काय चालू आहे, हे सगळं त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार”
संबंधित बातम्या
त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचे गंभीर आरोप
नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले