राष्ट्रवादीचा दसरा मेळाव्यासाठी पाठिंबा कोणाला?, बॅनर उभारत कार्यकर्त्यांचे हटके उत्तर
दसरा मेळावा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या महिनाभरापासून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. मात्र आता राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई: दसरा मेळावा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या महिनाभरापासून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेनेत (Shiv sena) जोरदार आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. त्यामुळे राजकारण देखील चांगलचं तापलं होतं. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होईल असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीने शिवसेना आणि शिंदे गटाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने (NCP) दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मातोश्रीबाहेर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे पोस्टर राष्ट्रवादीच्या वतीने उभारण्यात आले आहेत.
पोस्टरमध्ये नेमकं काय?
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शुभेच्छा देणारे बॅनर राष्ट्रवादीच्या वतीने मातोश्रीबाहेर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये एक संघटना, एक विचार, एकच मैदान, शिवसेनेचा दसरा मेळाव, दसरा मेळाव्यासाठी खूप-खूप शुभेच्छा असा मजकूर छापण्यात आला आहे. मातोश्रीबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. सध्या या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील दिसून येत आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार?
दरम्यान दुसरीकडे तुम्ही दसरा मेळाव्यात पहिलं कोणाचं भाषण ऐकणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांचेच भाषण ऐकेल व नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकेल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.