मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीचा प्रतिसाद, गर्दी होईल असे सर्व राजकीय कार्यक्रम टाळणार
गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनाई करण्यात आली आहे. तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबई : गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनाई करण्यात आली आहे. तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल, असा कार्यक्रम घेऊ नका, थोडे दिवस थांबा, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये धरला आणि तशा सूचना तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांना केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. (NCP responds to CM Uddhav Thackeray’s Appeal, Avoid crowded political events)
मुख्यमंत्र्यांचं सर्व राजकीय पक्षांना आवाहन
कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांना आवाहन केलं आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.
तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही
मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, ‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.
इतर बातम्या :
शेतकऱ्यांचं बुडीत शेतीचं कर्ज माफ करा, केवळ ट्विट नको, शासन निर्णय व्हावा; राजू शेट्टींची मागणी
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सुविधा कशी मिळणार?
NCP responds to CM Uddhav Thackeray’s Appeal, Avoid crowded political events