Praful Patel | प्रफुल पटेल अडचणीत येणार का? शरद पवार गटाकडून मोठी मागणी
Praful Patel | शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाला आहे. दिल्लीत आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. प्रफुल पटेल यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याची खेळी शरद पवार गटाने खेळली. त्यामुळे हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो.
नवी दिल्ली (संदीप राजगोळकर) : निवडणुकीच्याकाळात पवार कुटुंबातील जिव्हाळा दिसून आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी पुण्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी त्यानंतर बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. पण नजीक भविष्यात या दोन्ही गटांमध्ये सर्वकाही सुरळीत होण्याची चिन्ह दिसत नाहीयत. त्याच कारण आज दिल्लीत घडलेली एक घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना प्रफुल पटेल हे सतत शरद पवार यांच्यासोबत दिसायचे. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी प्रफुल पटेल यांची ओळख होती. शरद पवार सुद्धा कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी प्रफुल पटेल यांच्यासोबत चर्चा करायचे. पण काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ असे दिग्गज नेतेही सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये काही भेटी-गाठी झाल्या. त्यावरुन राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, असा कयास लावला गेला. पण असं झालं नाही. आता शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द करण्यासाठी कोण-कोण भेटायला गेलेलं?
अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांचं राज्यसभेच सदस्यत्व रद्द करण्यात यावं, यासाठी शरद पवार गटाच्या नेत्यांनी थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेतली. 4 महिन्यांपूर्वी 10व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. याआधी वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती.