पीयूष गोयल हे शेती तज्ञ? ही तर माझ्या ज्ञानात भर, शरद पवारांचा टोमणा
सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या सगळ्यात लक्ष घालण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली. | Sharad Pawar
बारामती: दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलकांशी केंद्र सरकारकडून चर्चा करण्यात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी टोला लगावला आहे. पीयूष गोयल हे मुंबईतील आहेत. ते आमचे मित्र आहेत. परंतु पीयूष गोयल आणि शेती यामधलं मला माहिती नाही. पीयूष गोयल हे शेतीतज्ज्ञ आहेत हे ऐकून माझ्या ज्ञानात नवी भर पडली, असे शरद पवार यांनी म्हटले. (Sharad pawar take a dig at Piyush Goyal over Farmers protest)
ते रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केले. सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या सगळ्यात लक्ष घालण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.
‘शेती हा राज्यांचा अखत्यारितील प्रश्न पण केंद्राने कायदा केला’
कृषी कायद्याबाबत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चर्चा सुरु झाली. त्यानंतर यूपीए सरकारच्या काळात आम्ही कृषी कायद्यांबाबत प्रत्येक राज्याचं मत मागवलं होतं. आम्ही यासाठी समितीही स्थापन केली होती. ही समिती मसुदा तयार करुन राज्यांना अभ्यासासाठी दिली होती. परंतु मोदी सरकारने थेट कायदाच लागू केला.
मुळात शेती हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याचे मत जाणून घेणे गरजेचे होते. कृषी कायदे करताना कोणतीही चर्चा झाली नाही. हा राज्याचा विषय असताना केंद्राने परस्पर कायदे केले, ही माझी तक्रार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात बदल होणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे बदल करण्याला माझा विरोध नाही. मात्र, त्यासाठी एकत्र चर्चा करुन निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
‘मोदी आणि गडकरींनी दिल्लीती शेतकऱ्यांशी थेट चर्चा करावी’
तीन-चार राज्यांतील शेतकरी दिल्लीत 70 दिवस ऊन, थंडी, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करात ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी अशाप्रकारे रस्त्यावर येतो तेव्हा सरकारने संवेदनशीलपणा दाखवला पाहिजे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी या ज्येष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार
पवारांची फक्त तीन वाक्यं आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर
(Sharad pawar take a dig at Piyush Goyal over Farmers protest)