काळजीवाहू ताई तेव्हा तुम्ही… रुपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळे यांना जळजळीत सवाल
राष्ट्रवादीच्या ( अजितदादा गट) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांना घेरलंय. 'आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की...
मुंबई | 24 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. तशी नोटीस त्यांना जारी करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी ही केंद्रीय यंत्रणा राहिली नाही तर ती भाजपची शाखा झाल्याची टीका केली. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. रोहित पवार यांनी ईडी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आजोबा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. यावरून राष्ट्रवादीच्या ( अजितदादा गट) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना थेट सवाल केला आहेत.
आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली. ते ईडी कार्यालय चौकशीसाठी निघाले. त्यापूर्वी त्यांनी शरद पवार याची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. काहीही झाले तरी सत्याचाच विजय होईल. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हान येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या ( अजितदादा गट) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांना घेरलंय. ‘आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की, जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकश्या सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले..?? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही..? तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे वाटले नाही का..? असा थेट सवाल रुपाली चाकणकर यांनी केला.
केवळ आदरणीय अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब, छगन भुजबळ साहेब, नवाबभाई मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्यावेळेस देखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का…? असा टोलाही रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
अजितदादा यांनी वेगळा निर्णय घेतल्याची १०० खोटी कारणे तुम्ही देत असाल. परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हे देखील तितकेच विदारक सत्य आहे, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.