ज्यांनी पोलिसांच्या माध्यमातून उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले…उदय सामंत यांचा पलटवार
लोकशाहीत त्यांना काहीही म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांनी 21 तारखेपर्यंत थांबायला हवं होतं. काही लोकं आपल्या नातेवाईकांना स्वत:च्या पैशाने घेऊन जात असतील तर त्यावर हरकत घेण्याचं काम नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यांनी सुरू केलं त्यांचे आणि मुरली देवरा यांचे संबंध होते. मिलिंद देवरा आजच फॉरेनला जात नाही. यापूर्वीही गेले होते. मंत्री म्हणून सर्वाधिक वेळा परदेशात गेलेले ते मंत्री आहेत, असं सांगतानाच एमएमआरडीएचं पाच लोकांचं शिष्टमंडळ आहे. 3 कोटी 85 हजार रुपये त्यांचा खर्च आहे. त्यांची माहिती ते देतील. आमचा खर्च तुम्हाला नंतर देऊ. तो 34 कोटी नाही. खर्च सस्पेन्स ठेवतो, असं उदय सामंत म्हणाले.
नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 जानेवारी 2024 : राज्य सरकार दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी जात आहे. यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळात अधिक लोकांचा भरणा असल्याने माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या दौर्यात सरकार 34 कोटी रुपये खर्च करणार असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. ज्यांनी पोलिसांच्या माध्यमातून उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले. त्यांनी इंडस्ट्री कशी चालवावी? किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं? याचं मार्गदर्शन करण्याची गरज नाही, असा पलटवार उदय सामंत यांनी केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांचा समाचार घेतला. उद्योजक आले पाहिजे. दाओसचा दौरा झाला पाहिजे. पण जे उद्योजक आहेत, त्यांच्या घराखाली सचिन वाझेने बॉम्ब ठेवला. तो सचिन वाझे कुणी घेतला? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? पूर्वीपर्यंत अदानी चालत होते. धारावीत टेंडर घेतल्यानंतर अदानी चालत नाहीत. त्यांना अदानी चालत नाही. त्यांच्याविरोधात मोर्चा निघतो. पण तेच अदानी शरद पवार यांना जाऊन भेटतात. हे नक्की काय आहे? ही संभ्रमावस्था आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
त्यावर हरकत काय?
एमएमआरडीएचं पाच लोकांचं शिष्टमंडळ आहे. कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून तीन लोकांचं शिष्टमंडळ आधीच तिथे गेलं आहे. ते स्वत:च्या खर्चाने गेले आहेत. त्यामुळे आक्षेपाचं कारण काय? ज्यांनी कधी स्वत:च्या खिशातून पैसे काढले नाही, त्यांना हे अप्रूप असू शकतं. राज्याचं आणि देशाचं नाव जगात वाढवण्यासाठी काही लोक स्वत:च्या खिशातून पैस देत असतील तर त्यावर हरकत काय? असा सवाल सामंत यांनी केला.
एक रुपयांचाही अपव्यय होणार नाही
आज खासदार आणि माजी खासदार दावोसला गेल्याचं मी पत्रकार परिषदेत ऐकलं. मी त्यांना आवाहन करतो, 21 तारखेपर्यंत थांबा. खर्च किती झाला हे पाहा. आम्ही माहिती दिल्यावर माहितीच्या अधिकारातूनही तुम्हाला माहिती मिळेल. शिष्टमंडळ मोठं असलं तरी यावेळचा दावोसचा दौरा कमी पैशात झालेला दिसेल. एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही, याची हमी देतो. येताना दावोसमधून ऐतिहासिक एमओयू करून मुख्यमंत्री येतील, असा दावा त्यांनी केला.
अपशकून करू नका
मी लंडनला गेलो होतो. वाघ नखं आणण्यासाठी. तेव्हा एमआयडीसीच्या खर्चाने गेल्याचा आरोप केला. पण तीन दिवसात ते तोंडघशी पडले. मी माझ्या वडिलांच्या खात्यातून पैसे घेऊन गेलो होतो. माझ्या बापाच्या खर्चाने मी गेलो होतो. जरा 21 तारखेपर्यंत थांबा. जनतेची दिशाभूल करणं थांबवा. 21 तारखेला आम्ही जेव्हा माहिती देऊ, पुरावे देऊ तेव्हा बोलावं. जाताना कुणी अपशकून करू नका, असंही ते म्हणाले.
तो एमओयू कुठे आहे?
उद्यापासून दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होत आहे. तिथे महाराष्ट्र आपला ठसा उमटवेल. आल्यावर आम्ही रुपयांचा पै न् पैचा हिशोब देऊ. मागच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री दावोसला जात असताना ऊर्जा मंत्री का गेले? पर्यटन मंत्री का गेले? त्यांचा ओएसडी का गेला? त्यांचा प्रायव्हेट ओएसडी का गेला? 50 हजार कोटीचा एमओयू कुठे आहे? तो सापडत नाही. उद्योजकही सापडत नाही, असा गंभीरा आरोप करतानाच आम्ही सर्वांचे अंदाज चुकतील असे एमओयू करून येऊ, असंही ते म्हणाले.