पोलिसांनी मनीष सिसोदिया यांना मानेला धरून न्यायालयात नेलं; अरविंद केजरीवाल संतापले
Manish Sisodia : पोलिसांनी मनीष सिसोदिया यांना मानेला धरून न्यायालयात नेलं; पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पोलिसांनी मानेला धरून न्यायालयात नेल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. मनीष सिसोदिया यांना आज दिल्लीतील राऊस एवेन्यू कोर्टात हजर केलं गेलं. यावेळी सिसोदिया यांना पोलिसांनी मानेला धरून नेल्याचं समोर आलं आहे. याचा व्हीडिओ आपच्या नेत्या अतिशी यांनी ट्विट केला आहे. त्याला रिट्विट करत केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.
राऊस एवेन्यू कोर्टात जाताना पोलिसांनी मनीष सिसोदिया यांच्यासोबत असं धक्कादायक वर्तन केलं. मनीष सिसोदिया यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या या पोलिसाला तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी अतिशी यांनी केली आहे.
Shocking misbehaviour by this policeman with Manish ji in Rouse Avenue Court. Delhi police should suspend him immediately. pic.twitter.com/q9EU0iGkPL
— Atishi (@AtishiAAP) May 23, 2023
व्हीडिओमध्ये नेमकं काय?
अतिशी यांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये पोलीस संरक्षणात मनीष सिसोदिया कोर्टाच्या दिशेने जात आहेत. यावेळी काहीजण त्यांचा व्हीडिओ शूट करत आहेत. यावेळी यातील एक पोलीस अधिकारी व्हीडिओ काढणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी मागे चालत असलेल्या सिसोदिया यांच्या मानेला धरून जोरात त्यांना पुढे घेऊन जातो. या व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.
अरविंद केजरीवाल संतापले
दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी अतिशी यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. पोलिसांना मनीष सिसोदिया यांच्याशी असा दुर्व्य्वहार करण्याचा अधिकार आहे? पोलिसांना असं करण्यासाठी वरून आदेश होते का?, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.
क्या पुलिस को इस तरह मनीष जी के साथ दुर्व्यवहार करने का अधिकार है? क्या पुलिस को ऐसा करने के लिए ऊपर से कहा गया है? https://t.co/izPacU6SHI
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 23, 2023
पोलिसांचं स्पष्टीकरण
आप आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडून लावण्यात आलेल्या आरोपांना दिल्ली पोलिसांच्या वतीने उत्तर देण्यात आलं आहे. पोलिसांवर केले जाणारे दुर्व्यवहाराचे आरोप दुष्प्रचार असल्याचं दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मनिष सिसोदिया यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आवश्यक ते पाऊल उचललं आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.