Nitesh Rane : ‘मुख्यमंत्री सकाळचं औषधसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादीला विचारून घेतात’, नितेश राणेंचा टोला; शिवलिंग विटंबना विरोधात नाशकात भाजपचा मोर्चा
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांना इतकी भीती वाटते की सकाळचं औषधही मुख्यमंत्री त्यांना विचारल्याशिवाय घेत नाहीत, असा टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय.
नाशिक : सोशल मीडियावर शिवलिंग विटंबना विरोधात नाशिकमध्ये भाजपकडून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. बी.डी. भालेकर मैदानावरुन मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पोलिसांनी आता खरी मर्दानगी दाखवावी. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला जाब विचारणार. मीच कसा हिंदू आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्या येणार आहेत. पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची (Congress, NCP) इतकी भीती वाटते की सकाळचं औषधही मुख्यमंत्री त्यांना विचारल्याशिवाय घेत नाहीत, असा टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय.
‘काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा’
काश्मिरी पंडित, औरंगाबाद नामांतर, राज्यसभा निवडणूक आदी मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत. तुम्ही इथलं सांभाळा. मुख्यमंत्र्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची इतकी भीती वाटते की सकाळची औषधंही ते त्यांना विचारून घेतात. मुख्यमंत्री असताना आमदारांना कोंडून ठेवावं लागतं, यातूनच काय उगवलं आहे हे कळतं. त्यांचा काहीही दावा असू द्या, 10 तारखेला काय ते स्पष्ट होईल.
‘पवारांवर कोणत्या मुलीने पोस्ट केली तर तिला जेलमध्ये टाकलं’
शिवलिंग विटंबना प्रकरणावर बोलताना नितेश राणे अधिक आक्रमक झाले. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली आहे. हिंदूहृदयसम्राटाचा मुलगा मुख्यमंत्री असताना अशा पोस्ट केल्या जात आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना पोलिसांना भेटल्या. पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. पोलिसांनी साधी दखलही घेतली नाही. उलट प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात पोस्ट लिहिल्यास ताबडतोब कारवाई केली जाते. पण या प्रकरणात अद्याप कारवाई नाही. त्या मुलाचे वय कमी असेल. पण त्याच्यामागे कोण आहे हे शोधण्याचे काम पोलिसांना करावं लागेल. आम्ही संयम सोडला तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची भाषा करु नये. हीच पोस्ट इतर धर्मियांबाबत असती तर दंगल घडली असती. पवारांवर कोणत्या तरी मुलीने पोस्ट केली तर तिला जेलमध्ये टाकलं. हिंदू आहोत म्हणून शांततेत मोर्चे निघत आहेत, अशा शब्दात नितेश राणे यांना नाशिक पोलीस आणि राज्य सरकारला इशारा दिलाय.