नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ, राष्ट्रगीतावेळी चक्कर
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली.
सोलापूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी खाली बसले आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. यावेळी मंचावर सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.
दरम्यान, नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भोवळ आल्यानंतर त्यांना तातडीने कुलगुरुंच्या निवास्थानी विश्रांतीसाठी नेण्यात आलं. तिथे थोडावेळ थांबून ते नागपूरकडे रवाना झाले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून विश्रांतीसाठी नागपूरकडे रवाना झाले.
गडकरींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. सोलापूर, सांगली येथे त्यांचे दौरे नियोजित होते, ते रद्द करण्यात आले.
EXCLUSIVE – नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भोवळ, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ #NitinGadkari pic.twitter.com/5GoMfGxwhn
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2019
याआधी नगरमधील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 7 डिसेंबर 2018 रोजी राहुरीत त्यांना चक्कर आली होती. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना अचानक चक्कर आली होती, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते.
त्यानंतर शिर्डीत 27 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांची प्रचारसभा आयोजित केली होती. त्यावेळी भाषणादरम्यान ते तीन वेळा सरबत प्यायले. त्यानंतर ते भाषण देण्यास उठले. मात्र त्यांना तब्येत जास्त बिघडत असल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाषण आटोपलं. त्यानंतर ते आपल्या जागेवर बसायला जाणार तेव्हा अचानक त्यांना चक्कर आली होती.
त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात भर मंचावर गडकरींना भोवळ येण्याची ही आजची तिसरी वेळ आहे.
नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ, राष्ट्रगीतावेळी चक्कर
वाचा – https://t.co/r55Yz6soef #NitinGadkari pic.twitter.com/NXJUNVClaU
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2019
नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नितीन गडकरी हे पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय झाले. नंतर भारतीय जनता पक्षात सक्रीयपणे काम करु लागले. सर्वसामान्य कार्यकर्ता ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, असा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास आहे. महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या काळात गडकरींनी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं. सध्याच्या मोदी सरकारमध्ये सर्वात आश्वासक चेहरा म्हणून नितीन गडकरी परिचीत आहेत.
संबंधित बातम्या