Video: मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर गडकरींचा व्हिडीओ व्हायरल का? गडकरी काय म्हणाले होते?
नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी म्हणून शेतकरी आंदोलनकांना डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा जूना व्हिडीओ व्हायरल करत भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. (Nitin Gadkari Social Media Video)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी राज्यसभेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. मोदींनी आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकल्याचं म्हटलं होते. त्यानंतर आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी केली. यानंतर राजकीय पक्षांसह सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत. नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या व्हिडीओ सोबतच भाजप नेत्यांचे आंदोलनातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. (Nitin Gadkari old video viral on social media after Narendra Modi Andolanjivi statement in Rajya Sabha)
गडकरींच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय?
नितीन गडकरी यांचा काँग्रेस नेते डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये नितीन गडकरींनी शांततापूर्ण आंदोलन करणं जनतेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.”पंतप्रधान जी गोष्ट सांगत आहेत ती लोकशाही विरोधी आहे, या देशात भ्रष्ट लोक आणि सरकारविरोधात आंदोलन करणं जनतेचा, विरोधकांचा, काम करणाऱ्यांचा अधिकार आहे. हा अधिकार आपल्याला काँग्रेसनं किंवा दिलेला नाही. तो अधिकार संविधानानं दिला आहे. मुलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करु नये, असं वक्तव्य पंतप्रधान कसं म्हणू शकतात. हे योग्य आहे का याचं आत्मपरिक्षण पंतप्रधानांनी करावं”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरींसोबत व्हिडीओमध्ये सध्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद देखील दिसत आहेत.
मोदींनी आंदोलनजीवी म्हटल्यानंतर विरोधकांकडून समाचार
राष्ट्रवादीने एक मिनिटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच व्हिडीओवर पाच कावळ्यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला पंतप्रधानांचं संसदेतील आजचं 13 सेंकदाचं भाषण दाखवण्यात आलं आहे. देशात आंदोलनजीवी नावाची नवी जमात आल्याचं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आजवर घेतलेल्या आंदोलनाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बाईट्सही दाखवण्यात आले असून त्यात ते राज्य सरकारला आंदोलन करण्याचा इशारा देत असताना दाखवलं आहे. हे फोटो आणि बाईट्स दाखवताना फोटो, बाईट्स संपताच पार्श्वभागाला मोदींचा आंदोलनजीवी हा शब्द ऐकायला येतो. त्यानंतर खवचट हसण्याचा आवाज येत असून या व्हिडीओतून राष्ट्रवादीने भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे.
ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात@PMOIndia @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @KiritSomaiya @smritiirani #आंदोलनजीवी #RajyaSabha #BudgetSession pic.twitter.com/RleOZuWhzT
— NCP (@NCPspeaks) February 8, 2021
‘आंदोलनजीवी’ असल्याचा आम्हाला अभिमान, संजय राऊतांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर
‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ आणि ‘गर्वसे कहो हम आंदोलनजीवी है. जय जवान, जय किसान’, असे दोन ट्वीट संजय राऊत यांनी केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटो जोडला आहे.
होय आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.. जय जवान जय किसान! pic.twitter.com/3CysKqFrtH
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आंदोलनजीवी म्हटल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये भाजप नेत्यांच्या आंदोलनाचे फोटो व्हायरल होतं असून भाजपला त्यावरुन प्रश्न विचारण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या
श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी
मोदी विरोधकांना म्हणाले, आंदोलनजीवी जमात; राष्ट्रवादीने व्हिडीओतून उडवली भाजपच्या आंदोलनांची खिल्ली
(Nitin Gadkari old video viral on social media after Narendra Modi Andolanjivi statement in Rajya Sabha)