Nitin Gadkari : गडकरींनी असं काय केलं की ट्विटरवर ट्रेंड झालेत, 15 हजारपेक्षा जास्त ट्विटस्, एकीकडे पवार-राऊत भेट, दुसरीकडे काश्मीर फाईल्सवर
विचाराची लढाई विचारानं, वैयक्तिक संबंध मात्र तेवढेच कसे जपायचे याचा वस्तूपाठ गडकरींनी पुन्हा घालून दिलाय. ट्विटरवर गडकरी ट्रोल होतायत. पण त्यांच्याकडे दूर्लक्ष केलेलं बरं असेही काही ट्विट आहेत.
नितीन गडकरींची (Nitin Gadkari) चर्चा होणार नाही असा एकही दिवस जात नाही. त्याला दोन कारणं आहेत. पहिलं-त्यांचा कामाचा धडाका आणि दुसरं म्हणजे सगळ्या पक्षात असलेली त्यांची उठबस. म्हणजे विरोधी पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे (BJP) नेते तीनदा विचार करतात. पक्ष नाराज तर होणार नाही ना याची काळजी घेतात. गडकरी मात्र त्याला अपवाद आहेत. एकदा त्यांना मुलायमसिंह यादवांनीच याबद्दल विचारलं होतं तर त्यांनी मिश्किलपणे ‘हम ही पक्षश्रेष्ठी है’ असं दिलेलं उत्तर चर्चेत होतं. त्यावेळेस गडकरी हे पक्षाध्यक्ष असावेत. आताही गडकरींनी काल जे केलं तेही तेवढच अफलातून आहे. खरं तर महाराष्ट्राची (Maharashtra) राजकीय संस्कृती दाखवणारं आहे. कालच्या दोन घटनांमुळे गडकरी ट्विटरवर ट्रेंड होतायत. जवळपास 15 हजार ट्विटस त्यांच्या नावानं केली गेलीयत.
Union Minister Nitin Gadkari, Shiv Sena leader Sanjay Raut & Maharashtra MLAs (of any party) reach NCP leader Sharad Pawar’s residence for dinner. pic.twitter.com/bA54cQUTcf
— ANI (@ANI) April 5, 2022
पवार-संजय राऊतांसोबत भेट
शरद पवारांनी काल दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय आमदारांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं. याचं निमंत्रण अर्थातच भाजपच्या आमदार-खासदारांनाही होतं. विशेषत: जे दिल्लीत होते. कार्यक्रम रात्री पार पडला. ह्या कार्यक्रमाला भाजपकडून रावसाहेब दानवे, भागवत कराड हे मंत्रीगणही उपस्थित होते. काँग्रेस-शिवसेनेचेही आमदार हजर होते. पण चर्चा झाली ती गडकरींच्या उपस्थितीची. दुपारी ईडीनं संजय राऊतांची संपत्ती जप्त केली तेव्हापासूनच भाजप नेते आणि राऊतांध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. त्यापार्श्वभूमीवर गडकरी-राऊत दिल्लीत आमने सामने आले. तेही पवारांच्या घरी. याचं महाराष्ट्राला फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण मराठी माणसाला इथली राजकीय संस्कृती माहित आहे. पण दिल्लीकरांच्या डोळे मात्र विस्फारले. गडकरी कसे काय पवारांच्या घरी जाऊ शकतात यापासून ते संजय राऊत वगैरे मंडळी कशी काय एकत्र येतात याचं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. कालपासून ट्विटरवर याची चर्चा सुरु झाली ती अजूनही थांबलेली नाही.
Very simple : Nitin Gadkari should have avoided last evenings dinner at Sharad Pawar’s house in Delhi where even Sanjay Raut was present. A very wrong message sent out ! Period !
But mark my words: No compromise now
— Vikrant Joshi (@joshivikrant75) April 6, 2022
काश्मीर फाईल्सच्या कार्यक्रमाला हजेरी
विस्थापित काश्मीरी पंडीतांच्या एका संघटनेनं काल दिल्लीत एक कार्यक्रम आयोजीत केला होता. काश्मीर फाईल्सचे अभिनेते अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि डायरेक्टर विवेक अग्नीहोत्रीचा सत्कार केला गेला. हा कार्यक्रम ग्लोबल काश्मीर पंडीत डायसोपरा (GKPD)नं आय़ोजीत केला होता. ह्या कार्यक्रमालाही नितीन गडकरींनी हजेरी लावली. भाजपचे आणखी एक नेते श्याम जाजूही उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, श्रीपाद नाईक, व्ही.के.सिग तसच आरएसएस नेते इंद्रेशकुमार यांनाही होतं. यापैकी एकही जण कार्यक्रमाला फिरकला नाही. गडकरी मात्र आवर्जून हजर होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात काश्मीरी पंडीत विदेशातून आलेले होते. त्यामुळे गडकरींच्या हजेरीची जोरदार चर्चा झाली.
गडकरी काय म्हणाले?
काश्मीरी फाईल्सच्या कलाकारांचं कौतूक करताना गडकरी म्हणाले- काश्मीर खोऱ्यातली खरी स्थिती ह्या सिनेमात दाखवली गेलीय. हेही वास्तव आहे की, काश्मीरी पंडीतांना छळ करुन त्यांना घरदारं सोडायला भाग पाडलं. विवेक अग्नीहोत्रींनी काश्मीरी पंडीतांची स्थिती योग्यरितीनं दाखवलीय. इतिहास त्यांनी पुन्हा उजाडेत आणल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काश्मीरी पंडीतांबद्दलचं सत्य लपवण्याचा प्रयत्न केला गेला.
गडकरींचं वेगळेपण
गेल्या तीन दिवसातले गडकरींचे कार्यक्रम पाहिले तर त्यांचं वेगळेपण स्पष्टपणे जाणवतं. अचानकपणे ते सध्या वादात असलेल्या राज ठाकरेंच्या घरी भेटीला गेले. त्यानंतर त्यांनी शरद पवार-संजय राऊत यांच्यासोबतच्या कार्यक्रमात हजेरी लावली, नंतर पवारांचा ज्या सिनेमाला विरोध आहे, त्याच्याच कलाकारांचं त्यांनी स्वागत केलं कौतूक केलं. विचाराची लढाई विचारानं, वैयक्तिक संबंध मात्र तेवढेच कसे जपायचे याचा वस्तूपाठ गडकरींनी पुन्हा घालून दिलाय. ट्विटरवर गडकरी ट्रोल होतायत. पण त्यांच्याकडे दूर्लक्ष केलेलं बरं असेही काही ट्विट आहेत.
हे सुद्धा वाचा: