Eknath Shinde : ईडीच्या भीतीने कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नका, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन; राऊतांवरील कारवाईचं समर्थन
शनिवारपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औरंगाबादेतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : शनिवारपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औरंगाबादेतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे गट हे ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या बळाचा वापर करत आहेत, त्यामुळे शिंदे गटात आणि भाजपात अनेक जण सामील होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईचे देखील समर्थन केले आहे. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, रोज सकाळी 9 वाजता ते प्रसार माध्यमांसमोर येऊन संवाद साधतात. ते आमच्यावर ईडीचा आरोप करत आहेत, पण माझा प्रश्न आहे त्यांना कोणी भाजपमध्ये बोलावलं आहे का? कोणी जर ईडीच्या भीतीने आमच्याकडे येत असेल किंवा भाजपामध्ये जात असेल तर त्यांनी जाऊ नये असे आवाहन मी करतो असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
आम्हाला दबाव टाकून कोणालाही आमच्या सोबत घ्यायचे नाही. त्यामुळे जर कोणी ईडीच्या भीतीमुळे आमच्याकडे किंवा भाजपाकडे जात असेल तर कृपया त्यांनी जाऊ नये, असे मी आव्हान करतोय. खोतकर असो की कोणीही असो, ईडीच्या कारवाईला घाबरून भिऊन, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नका. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं सगळं झालं. ज्या घडामोडी पाहिल्या त्यात एक तरी सुडाची कारवाई पाहिली का?. आमच्यावर ईडीचा दबाव होता म्हणून आम्ही शिंदे गटात गेलो असे आतापर्यंत एका तरी आमदारांनी सांगितले का? अस सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही सध्याचा कालावधी पूर्ण तर करूच पन पुन्हा बहुमताने निवडून येऊ असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊतांवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांची सध्या इडीकडून चौकशी सुरू आहे, त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे महाविकास आघाडीमधील मोठे नेते आहेत. ते रोज सकाली 9 वाजता माध्यमांसमोर येऊन संवाद साधत असतात. चौकशी सुरू आहे, त्यांना अटक कधी होईल हे मला माहित नाही, कारण मी काय ईडी अधिकारी नाही. ईडीची चौकशी सुरू आहे. चौकशी होऊ द्या. राऊत म्हणाले मी काही केलं नाही. मग कर नाही त्याला डर कशाला. चौकशीत जे काय आहे ते सत्य बाहेर येईलच असे यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.