शासनाने शाळांना अनुदान न दिल्यास नाईलाजाने नक्षली होवू, शिक्षकांचा निर्वाणीचा इशारा
राज्यात विना अनुदानित शाळांचा आणि त्यात काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या शिक्षकांनी निवेदनं, मोर्चा, आंदोलन आणि उपोषणाचा संवैधानिक मार्ग अवलंबून आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
यवतमाळ : राज्यात विना अनुदानित शाळांचा आणि त्यात काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या शिक्षकांनी निवेदनं, मोर्चा, आंदोलन आणि उपोषणाचा संवैधानिक मार्ग अवलंबून आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, आता या शिक्षकांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य न झाल्यास थेट नक्षली चळवळीत सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.
मागील 18 वर्षांपासून विनावेतन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांनी यवतमाळ येथे आंदोलन केले. यात विना अनुदानित शाळा शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला.
शिक्षकांनी सांगितले, ‘आम्ही ज्या शाळा कॉलेजला शिकवतो त्याला शासनाने अनुदान द्यावे. 18 वर्षांपासून आम्हाला पगार नाही. शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळेच हे होत आहे. शासनाने आता ईच्छा मरणाची परवानगी द्यावी. त्यानंतर आमच्या कुटूंबाची जबाबदारी शासनाची राहील. मात्र, शासन असं करायलाही तयार नसेल आणि आमची दखलही घेत नसेल तर आम्ही नाईलाजाने टोकाचं पाऊल उचलत नक्षलवादी होण्याचा मार्ग स्वीकारू.