आता तर मोदी मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत; संजय राऊतांचा उपरोधिक टोला
गुजरात क्रिकेट बोर्डाने स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायला मान्यता दिली असेल. | Sanjay Raut
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आता मला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान मोटेरा स्टेडियमचा उद्घाटन सोहळा बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला. या मैदानाचं नाव सरदार पटेल स्टेडियम असं होतं. मात्र, उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा केली होती. (Shivsena MP Sanjay Raut taunts PM Narendra Modi)
या सगळ्याबाबत संजय राऊत यांना गुरुवारी मुंबईत विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी, हा गुजरात सरकारचा निर्णय आहे, आपण त्याबाबत काय करु शकतो, असे म्हटले. गुजरात क्रिकेट बोर्डाने स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायला मान्यता दिली असेल. अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारचे निर्णय झाले असतील तर मला माहिती नाही. पण आता मला नरेंद्र मोदी हे सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
मोटेराच्या मैदानात पहिल्याच दिवशी गुगली, अमित शाहांनी मैदानाचं नावच बदललं
गुजरातमधील अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेलं जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान मोटेरा स्टेडियमचं (Motera Cricket Stadium) नाव बदलण्यात आलं आहे. हे मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) म्हणून ओळख जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. यापूर्वी या मैदानाचं नाव सरदार पटेल स्टेडियम असं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन झालं. यावेळी अमित शाह, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते.
मोटेराची ठळक वैशिष्ट्य
साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये 2 ड्रेसिंग असतात. पण मोटेरामध्ये तब्बल 4 ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण 55 क्लबहाऊस आहेत. त्यात 3 प्रॅक्टीससाठीची मैदानं आणि 50 खोल्यांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकसाठी बनवतात तसा स्विमींग पूलसुद्धा या स्टेडियममध्ये आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, टेबल-टेनिस एरीना, स्क्वॅश एरीना, 3D प्रोजेक्टर असलेलं थिएटरही या स्टेडियममध्ये आहे. या स्टेडियममध्ये फ्लड लाइटऐवजी LED लाइट्स वापरलेत. यामुळे कशाचीच सावली दिसत नाही. अनेकदा खेळाडूंना सामन्यादरम्यान सावलीमुळे अडथळा निर्माण होता.
मोटेरा स्टेडियमच्या मैदानात 4-6 नव्हे तर तब्बल 11 खेळपट्ट्या आहेत. लाल, काळी आणि दोन्ही प्रकारची माती अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळपट्ट्या आहेत. यातल्या काही वेगवान तर काही फिरकी गोलंदाजांस मदतशीर आहेत. स्पर्धेची, मॅचची गरज बघून खेळपट्टी निवडता येणार आहेत.
संबंधित बातम्या
(Shivsena MP Sanjay Raut taunts PM Narendra Modi)