वडेट्टीवारांवर अडीच कोटीच्या घोटाळ्याचा आरोप; हा घोटाळा पचवू देणार नाही, प्रकाश शेंडगेंचा इशारा
मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी अडीच कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. विजय वडेट्टीवार यांना हा घोटाळा पचवू देणार नाही, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा महाज्योती कार्यालयावर विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा काढणार, असा इशारा शेंडगे यांनी दिला.
उस्मानाबाद : काँग्रेस नेते आणि मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी अडीच कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. विजय वडेट्टीवार यांना हा घोटाळा पचवू देणार नाही, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा महाज्योती कार्यालयावर विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा काढणार, असा इशारा शेंडगे यांनी दिला. प्रकांश शेंडगे हे आज उस्मानाबाद येथे ओबीसी आरक्षण बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी वडेट्टीवारांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. (Prakash Shendge accuses minister Vijay Vadettiwar of scam of Rs 2.5 crore)
नागपूर येथील नागपूर फ्लाईंग क्लब या 4 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम दिलं. नागपूर फ्लाईंग क्लबला अडीच कोटी देऊन 6 महिने झाले तरी एकाही विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिले गेले नाही. बंद पडलेल्या या प्रशिक्षण कंपनीकडे स्वतःचे विमान नाही, प्रशिक्षक नाही, इतकंच काय तर कमर्शिअल पायलट ट्रेनिंग देण्याचा परवानाही नाही. असं असलं तरी कंपनीला अडीच कोटी दिले गेले, असा आरोप शेंडगे यांनी केलाय.
‘कंपनीला पैसे दिले, एकाही विद्यार्थ्याला प्रशिक्षण नाही’
बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती सुरू केली. यातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार केली व करोडो रुपये दिले गेले. मात्र, एकाही विद्यार्थ्याला अद्याप प्रशिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपालट होत आहे. 17 जून 2017 पासून प्रशिक्षण देणारी नागपूर क्लब बंद आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, विमान, प्रशिक्षक नाहीत. या खात्याचे मंत्री वडेट्टीवार नागपूरचे, महाज्योतीचे कार्यकारी संचालक डांगे हेही नागपूरचे तर प्रशिक्षण देणारी कंपनीही नागपूरची, त्यामुळे हे सगळे साटेलोटे असल्याचा आरोहीही शेंडगे यांनी केलाय. हा विमान प्रशिक्षण घोटाळा त्यांना पचवू देणार नाही असे शेंडगे म्हणाले. महाज्योतीचे संचालक स्वतः या संस्थेचे अध्यक्ष वडेट्टीवार यांचा राजीनामा मागत नवीन अध्यक्ष देण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करीत आहेत. शेंडगे यांनी आरोप केल्याने महाज्योतीची विमान प्रशिक्षण योजना व मंत्री वडेट्टीवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
‘..तर भीक मागुन पैसे गोळा करू पण काम करा’
ओबीसी आरक्षणबाबत इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारकडे निधी नसेल तर सरकारने आम्हाला सांगावे, आम्ही भीक मागून पैसे गोळा करून आयोगाला देऊ पण काम सुरू करा. केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला आरक्षण नाही. त्यांच्या चुकांची शिक्षा ही संपूर्ण समाजाला दिली जात आहे. यामुळे 56 हजार कार्यकर्ते यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करू दिले जाणार नाही. यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिला.
‘निवडणुका पुढे ढकला किंवा अद्यादेशानुसार घ्या’
इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने कोर्टात वेळ मागावा. कोर्टात आरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्यानुसार पावले उचलणे गरजेचे आहे. कोर्टात आरक्षण टिकेल अशी अपेक्षा शेंडगे यांनी व्यक्त केली. मागासवर्ग आयोगाचे सदस्य काम, निधी व इतर यंत्रणा नसल्याने राजीनामा देत आहेत, काम ठप्प आहे. अजून काय भोग भोगायचे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ओबीसीचा आरक्षणचा घटनात्मक अधिकार कुणी काढून घेऊ शकत नाही, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला किंवा अद्यादेशानुसार घ्या, असं शेंडगे म्हणाले.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, प्रा. टी पी मुंडे, चिटणीस रफिक कुरेशी, उस्मानाबाद येथील ऍड. खंडेराव चौरे, धनंजय शिंगाडे, संतोष हंबीरे, लक्ष्मण माने, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, पांडुरंग कुंभार, इंद्रजीत देवकते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या :
महापालिका प्रभाग रचनेत पुन्हा बदलाची शक्यता! बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर
Prakash Shendge accuses minister Vijay Vadettiwar of scam of Rs 2.5 crore