बीडमध्ये पुन्हा एकदा काका-पुतण्याचं राजकारण तापणार!, 5 नगरसेवकांवर कारवाईची शक्यता
शिवसेनेत प्रवेश केलेल्या काकू-नाना आघाडीच्या 5 नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळतेय. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
बीड : मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेल्या काकू-नाना आघाडीच्या 5 नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळतेय. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी पाचही नगरसेवकांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 23 फेब्रुवारीला होणार आहे. या प्रकरणामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि काका भारतभूषण क्षीरसागर पुन्हा आमनेसामने आले आहेत.(Once again in Beed, Sandeep Kshirsagar faced Bharatbhushan Kshirsagar)
शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रभाकर पोकळे, रंजित बनसोडे, सीता मोरे, कांता तांदळे आणि अश्विनी गुंजाळ या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा बीड नगरपालिकेचं राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीड शहरात पुन्हा काका विरुद्ध पुतण्याचं राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत काका पुतण्यावर भारी
विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभवाचा झटका दिला होता. पण साधारण वर्षभरानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र काकांनी पुतण्याला धोबीपछाड दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर प्रचंड बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळालं. पराभवामुळे नैराश्यात गेलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडून नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीत एकही अर्ज सादर करण्यात आला नाही. त्यामुळे स्थायी समितीवर भारतभूषण क्षीरसागर यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. आधीच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या हातून स्थायी समितीचीही सत्ता गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बीड मतदारसंघाचा नवा चेहरा म्हणून आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. मात्र वर्षभरातच संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा कौल समजून घेता आला नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा दणका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी पराभूत झालेले काका जयदत्त क्षीरसागर यांचं पारडं बीडमध्ये जड होताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पुतण्याला धूळ चारत जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे. काल शुक्रवारी बीड नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होती. नगरपालिकेत काका- पुतणे आमनेसामने आहेत. संदीप क्षीरसागर यांच्याकडून नगरपालिकेच्या स्थायी समितीवर रस्सीखेच होईल अशी जाणकारांना अपेक्षा होती. मात्र संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडून एकही अर्ज आला नसल्याने काका भारतभूषण क्षीरसागर यांचं वर्चस्व कायम राहिलं. ग्रामपंचायत निवडणुकीत अपयश आल्यानंतर संदीप क्षीरसागर हे जेरीस आल्याची चर्चा या निमित्ताने मतदारसंघात सुरू आहे.
संबंधित बातम्या :
भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!
पुरावे देतो, फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा, खोटे निघाल्यास माघार, संदीप क्षीरसागर यांचा हल्लाबोल
जयदत्त क्षीरसागर…. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद
Once again in Beed, Sandeep Kshirsagar faced Bharatbhushan Kshirsagar