स्वाभिमान शिल्लक असेल तर पदावर राहायचं की नाही ठरवायला हवं!, शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केंद्र नाराज असल्याचं समोर आलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या पत्राबाबत आपली नाराजी व्यक्त केली. तोच धागा पकडत शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
उस्मानाबाद: ‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातील भाषेवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनीही त्यांना जोरदार प्रत्युतर दिलं. तर शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांची तक्रार केली होती. पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. त्यावेळी तुळजापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी राज्यपालांवर तोफ डागली. (Sharad Pawar on governor letter to cm )
राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील नाराज आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी आपण ते पत्र वाचल्याचं म्हटलंय. त्यातील काही शब्द कोश्यारी यांनी टाळायला हवे होते, असं अमित शाह म्हणाले. तोच धागा पकडत शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर हल्ला चढवला. ‘शहाण्याला शब्दाचा मार…’ या म्हणीचा वापर करत राज्यपाल कोश्यारी यांनी काही स्वाभिमान शिल्लक असेल तर आता पदावर राहायचं की नाही हे ठरवावं, असं टीकास्त्र शरद पवार यांनी सोडलं.
काय आहे प्रकरण?
राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. ‘राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?’ अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली होती. पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या:
राज्यपाल कोश्यारींवर आधी मुख्यमंत्री कडाडले, आता ओवेसीही भडकले!
Sharad Pawar on governor letter to cm