Abhijit Patil | ‘आयकरच्या चौकशीत काहीच आढळलं नाही, पण विरोधकांच्या षडयंत्राला उत्तर देणार’, अभिजित पाटील यांचा इशारा
अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील आहेत. मागील 10 वर्षातच साखर सम्राट अशी त्यांनी नवी ओळख निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्या. त्यानंतर ते जास्त प्रकाशझोतात आले.
उस्मानाबादः अल्पावधीतच साखर सम्राट अशी ओळख मिळवणाऱ्या अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या चारही साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाड (Income tax raid) टाकली. मात्र आयकरच्या चौकशीत काहीही आढळलं नाही. मी माझ्या प्रामाणिक पणावर पैसा जमवला आणि कारखाने उभे केले, असा दावा अभिजित पाटील यांनी केला. रविवारी रात्री पाटील यांच्या कारखान्यांची (Sugar Factory) तसेच त्यांची इतर चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 ला मुलाखत दिली. मी तर या सर्व प्रकरणात निर्दोष आहे आणि तसं चौकशीतूनही दिसून आलंय, ज्या विरोधकांनी हे षडयंत्र रचलंय, त्यांची नावं योग्य वेळी उघड करेन, असा इशारादेखील अभिजीत पाटील यांनी दिलाय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात मी मिळवलेला विजय विरोधकांना पचला नाही, त्यामुळेच हा कट रचला गेल्याचा आरोप पाटील यांनी केला..
अभिजित पाटील काय म्हणाले?
आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर रविवारी रात्री मुलाखती दरम्यान अभिजीत पाटील म्हणाले, ‘ आयकरकडे जी माहिती गेली होती की आम्ही एकानंतर एक साखर कारखाने कसे उभे करत आहोत, एवढा पैसा कुठून आणतोयत? यासाठी ही चौकशी सुरु होती. पण आम्ह ज्या बँकांकडून कर्ज घेतलं, काही कारखाने आम्ही भाडेतत्त्वावर घेतल्यामुळे त्याला भांडवलाची गरज पडली नाही. या गोष्टींचं स्पष्टीकरण आणि काही व्यवहारांचं समर्थन झाल्यानंतर त्यांचं समाधान झालं नाही. कुठेही अतिरिक्त कॅश, सोनं सापडली नाही. तपासणीत त्यांनी जी मागणी केली, ते मिळाले. काही कागदपत्र देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. ती आम्ही देणार आहोत. सगळ्या ठिकाणांची कारवाई पूर्ण झाली आहे.
विठ्ठल कारखान्याच्या विजय खुपला?
विठ्ठल सहाकरी साखर कारखान्यातील विजयामुळेच हा डाव रचल्याचा आरोप अभिजीत पाटील यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढली. या निवडणुकीत यश आलं. त्यामुळे कुठं तरी यशाचा वारु रोखला पाहिजे, यासाठी विरोधकांनी मिळून या गोष्टी केल्या असाव्यात, असं वाटतंय. महाराष्ट्रात एवढे उद्योजक आहेत, पण माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली गेली. सोशल मीडियातूनही थेट कार्यक्रम केल्याचं बोललं जातंय… हे चुकीचं आहे…
विठ्ठल दोनदा पावला?
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवल्यानंतर विरोधकांची ही खेळी केल्याचा आरोप पाटील यांनी केला. मात्र या चौकशीनंतर विठ्ठल मला दोनदा पावला असं वक्तव्य अभिजित पाटील यांनी केलं. ते म्हणाले, ‘ विठ्ठल कारखान्याची निवडणूक सभासदांच्या विश्वासाने मी जिंकली आणि आज या कारवाईनंतरही मी उजळ माथ्याने फिरू शकतोय. माझ्याकडे तपासण्यात आलं, पण मी जमवलेली माया प्रामाणिकपणातून आणि कष्टातून मिळाली आहे.
विरोधकांचं नाव योग्य वेळी घेऊ….
माझ्याविरोधात हे षडयंत्र कुणी रचलंय, हे सर्वांसमोर उघड आहे, मात्र मी आताच त्याचं नाव जाहीर करणार नाही. वेळ आली की नाव घेईन आणि त्याला जशास तसं उत्तर देईन, अशा इशाराही अभिजीत पाटील यांनी दिलाय.
कोण आहेत अभिजीत पाटील?
अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील आहेत. मागील 10 वर्षातच साखर सम्राट अशी त्यांनी नवी ओळख निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्या. त्यानंतर ते जास्त प्रकाशझोतात आले. विठ्ठव सहकारी व धाराशिव साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. सध्या त्यांच्या ताब्यात 5 साखर कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक आणि नांदेड येथेही प्रत्येक एक आणि धाराशिव येथे एक कारखाना आहे.