शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव
डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते.
पालघर : शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित (Rohit Rajendra Gavit) यांना संधी देण्यात आली होती.
डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.
रोहित गावितांच्या उमेदवारीला विरोध
डहाणूतील वणई गटातून रोहित गावित सेना उमेदवार उमेदवार होते. रोहित गावित हे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आहेत. विरोध डावलून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रोहित गावितांच्या उमेदवारीला स्थानिकांसह शिवसैनिकांचाही विरोध होता
शिवसेनेत बंडखोरीची शक्यता
दरम्यान, शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक उमेदवाराला डावलून खासदार राजेंद्र गावित यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिल्याने शिवसेनेत आणखी बंडखोरीची भीती होती.
कोण आहेत राजेंद्र गावित?
अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवून राजेंद्र गावित याठिकाणी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास केला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी हा भाग डहाणू लोकसभा मतदारसंघात येत असे. या मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मात्र, राजेंद्र गावित यांनी 2018 मध्ये हे वर्चस्व मोडून काढत भाजपला विजय मिळवून दिला होता.
राजेंद्र गावितांचा राजकीय प्रवास
भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी 2018 साली पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने चिंतामण वगना यांचे सुपूत्र श्रीनिवास वगना यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यावेळी भाजपकडून राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवण्यात आले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती.
मात्र, 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा दिलजमाई झाली. जागावाटपात पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे राजेंद्र गावित यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना-भाजपच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर राजेंद्र गावित यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.
संबंधित बातम्या:
पाचवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली, इंदिरा गांधींचा लिटल खासदार, कोण होते दामोदर शिंगडा?