Pankaja Munde : पंकजा मुंडे विधान परिषदेवर जाणार, चर्चेला उधाण; मग परळी विधानसभेचं काय?
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यास परळी विधानसभेचं काय? असा प्रश्न विचारला जातोय.
बीड : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात असल्याने राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीही निवडणूक लागली आहे. त्यासाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक (MLC Election) लागल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून काही नावं समोर येत आहेत. त्यात भाजपमधून राष्ट्रीय सचिव आणि राज्यातील बड्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव चर्चिलं जात आहे. पंकजा मुंडे यांनीही विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास संधीचं सोनं करेन, असं म्हटलं आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) उमेदवारीवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यास परळी विधानसभेचं काय? असा प्रश्न विचारला जातोय.
पंकजा मुंडे यांनी 2009 पासून परळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून पंकजा मुंडे यांचं राज्यात पुनर्वसन झालेलं नाही. मात्र, त्यांना भाजपचं राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलं, तसंच मध्य प्रदेशचे भाजप प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आलीय. गोपीनाथ मुंडे यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपण दिलेल्या जबाबदारीवर समाधानी आहोत, असं म्हटलं होतं. तसंच विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास संधीचे सोने करीन, असंही त्या म्हणाल्या.
विधान परिषदेवर गेल्यावर लगेच विधानसभा मिळणार का?
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे काही काळ विजनवासात गेल्याचं पाहायला मिळालं होतं. या काळात त्यांनी कुटुंबाकडे, मुलांकडे अधिक लक्ष दिलं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. तसंच पुन्हा एकदा लोकांशी जोडले जाण्याचा, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा, तसंच अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. त्यातच आता विधान परिषदेसाठी त्यांचं नाव पुढे येत आहे. पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यास 2024 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार का? भाजपकडून एकाच कुटुंबात जास्त उमेदवार देण्यास विरोध आहे. त्याला काही अपवाद आहेत. पण विधान परिषदेवर गेल्यानंतर पंकजा यांना लगेच विधानसभा मिळणार का? असाही प्रश्न आहे.
धनंजय मुंडेंविरोधात भाजपला तगड्या उमेदवाराची गरज
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपली मुळं घट्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी भाजपला पंकजा मुंडे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराची गरज भासणार आहे. त्यामुळे पंकजा यांना विधान परिषदेऐवजी विधानसभा लढवावी, असाही एक सूर भाजपमध्ये उमटत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मग विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे?
त्यातच पंकजा मुंडे या विधान परिषदेवर गेल्यास त्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आतापासूनच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून उल्लेख केला जात आहे. त्यामुळे त्या विधान परिषदेवर गेल्यास विरोधी पक्षनेतेपदाची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करुनच भाजप निर्णय घेण्याची शक्यता आहे.