‘जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’, शेती नुकसानाच्या पाहणीवेळी पंकजा मुंडेंची टीका
परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईसह जमिन खरवडून गेल्यानं त्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बीड : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईसह जमिन खरवडून गेल्यानं त्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावरही त्यांनी टीका केलीय. (Pankaja Munde inspects agricultural damage caused by heavy rains)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. तसंच गेवराई, माजलगाव आणि परळीत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. जयंत पाटील यांच्या या दौऱ्यावर पंकजा मुंडे यांनी टीका केलीय. बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण आता या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा बीड दौरा झाला. मात्र, एकाही बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटलांच्या दौऱ्यावर टीका केलीय.
परळीच्या देशमुख टाकळी येथे आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा,अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। pic.twitter.com/UwqsvbxfOx
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 28, 2021
हा आपल्याला धक्का नाही – पंकजा मुंडे
दरम्यान, काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश म्हणजे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, ते राष्ट्रवादीत गेले हा आपल्याला धक्का नाही. माझी विनंती आहे की त्या प्रश्नांऐवजी शेतकऱ्यांवर चर्चा करावी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तसंच धनंजय मुंडे यांच्या पाठीशी कोण आहे आणि नाही हे मला माहिती नाही. मात्र, गोपीनाथ गडावर येऊन सर्वांना नतमस्तक व्हावं लागतं. ही ताकद मुंडेंची कन्या म्हणून माझी आहे, असं वक्तव्यही पंकजा मुंडे यांनी केलंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
वैद्यनाथच्या उपाध्यक्षांसह 5 संचालक राष्ट्रवादीत!
वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पंकजा मुंडे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णांचे सहकारी आज आपल्यासोबत आल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.
वैद्यनाथ कारखाना ताब्यात घेऊ शकतो, धनंजय मुंडेंचा इशारा
दरम्यान, आपलाय भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना इशारा दिलाय. वैद्यनाथ कारखानाही ताब्यात घेऊ शकतो. मात्र, आपल्याला तसं करायचं नाही. लढाई करुनच कारखाना ताब्यात घेईन, असा सूचक इशारा धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना दिलाय.
इतर बातम्या :
अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी
नाशिकची जीवनवाहिणी असणारे गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी 12 पासून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू
Pankaja Munde inspects agricultural damage caused by heavy rains