पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ कारखान्याच्या उपाध्यक्षांसह 5 संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गोपीनाथराव मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठा धक्का दिलाय. गोपीनाथराव मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. (Vaidyanath Sahakari Sugar Factory Vice President and 5 Directors join NCP)
वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पंकजा मुंडे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णांचे सहकारी आज आपल्यासोबत आल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.
आज परळीत @NCPspeaks चे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव दादांसह 5 संचालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. या प्रवेशामुळे संघटनेला आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत. pic.twitter.com/XojX5UrZxb
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 27, 2021
उपाध्यक्षांसह 5 संचालकांचा पंकजाताईंना रामराम!
यावेळी नामदेवराव आघाव यांच्यासह वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, अश्रूबा काळे, भाऊसाहेब घोडके, माऊली मुंडे, किसनराव शिनगारे, पांडुरंग काळे यांच्यासह सेवा सहकारी सोसायटी पांगरीचे महादेव मुंडे, महादेव सदाशिव मुंडे, मोहन गित्ते यांसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
वैद्यनाथ कारखाना ताब्यात घेऊ शकतो, धनंजय मुंडेंचा इशारा
दरम्यान, आपलाय भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना इशारा दिलाय. वैद्यनाथ कारखानाही ताब्यात घेऊ शकतो. मात्र, आपल्याला तसं करायचं नाही. लढाई करुनच कारखाना ताब्यात घेईन, असा सूचक इशारा धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना दिलाय.
यावेळी व्यासपीठावर आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या ताई सिरसाट, उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली ताई चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर, यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर बातम्या :
आता टार्गेट रश्मी ठाकरे! उद्धव ठाकरेंनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला; सोमय्यांचा घणाघात
Vaidyanath Sahakari Sugar Factory Vice President and 5 Directors join NCP