आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे परभणी पक्षाचे बळ वाढले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली
मुंबई : परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी भवनामध्ये ‘घनदाट मामा’ यांचा पक्षप्रवेश झाला. सीताराम घनदाट हे अपक्ष आमदार होते. (Parabhani Ex MLA Sitaram Ghanadat enters NCP)
सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे परभणी पक्षाचे बळ वाढले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. “घनदाट मामा चांगले नेते आहेत, ते गेले काही महिने संपर्कात होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट मागितलं होतं, पण आम्ही देऊ शकलो नाही” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
कोण आहेत सीताराम घनदाट?
सीताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते 2009 मध्ये आमदार होते. यंदाच्या निवडणुकीतही ते अपक्ष रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. गंगाखेड विधानसभेचे तिकीट देण्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रयत्न केला होता. पण त्यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या जागी घनदाट यांना उमेदवारी देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे घनदाट यांचा राष्ट्रवादीप्रवेश तेव्हा स्थगित झाला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे या दोघांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातून बाजी मारली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री ना.@AjitPawarSpeaks, माझ्या तसेच जलसंपदा मंत्री (Parabhani Ex MLA Sitaram Ghanadat enters NCP)तथा प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/Z1Y9PdgLwo
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) September 16, 2020
दर आठवड्याला पक्षप्रवेश : जयंत पाटील
“आता परभणीत आमची ताकद वाढेल. पक्ष जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. हळूहळू दर आठवड्याला पक्षात नवीन लोक येतील” असा दावाही जयंत पाटलांनी केला.
भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत
गेल्याच आठवड्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला.
संबंधित बातम्या :
अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत
(Parabhani Ex MLA Sitaram Ghanadat enters NCP)