Parth Pawar | भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळणार?
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय.
पंढरपूर: पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली आहे. (Demand for candidature of Parth Pawar in place of Bharat Bhalke)
अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तसं पत्र लिहिलं आहे. पंढरपूर मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय. दरम्यान, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचं पुनर्वसन केलं जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारत भालके यांचा दुर्दैवी मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा 27 नोव्हेंबरला मध्यरात्री मृत्यू झाला होता. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत भालके यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना परत घरी पाठवण्यात आलं. पुढे काही दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
भारतनानांचा वारसा मुलाकडे
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला. सहाय्यक निबंधक एम एस तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
‘भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला’
Demand for candidature of Parth Pawar in place of Bharat Bhalke