पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ते’ पत्र पाठवणाऱ्यांना भाजपचं उत्तर, तपास यंत्रणांच्या कारवाईवरून पहिल्यांदाच स्पष्टीकरण, महाराष्ट्रात पत्रकार परिषद?
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, बीएसएसचे के चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, भगवंत मान, बिहारचे अखिलेश यादव, तेजस्वी यादव, जम्मूचे फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संयुक्त पत्र लिहिलंय.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली | देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप (BJP) सरकार यांच्याविरोधात गेल्या काही दिवसात विरोधकांची मोट अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे. देशातील ९ विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्रच लिहिलं. विविध राज्यांमधील भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. ज्यांचा दोष नाही, त्यांना केवळ चौकशीसाठी म्हणून तुरुंगातही टाकलं जातंय, असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी हे पत्र लिहिलंय. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने यावर प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. देशातील सात राज्यांमध्ये विशेष पत्रकार परिषद घेऊन भाजप विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहे. त्यामुळे या स्पष्टीकरणाकडे आता देशाचं लक्ष लागलंय.
महाराष्ट्रात होणार का पत्रकार परिषद?
देशातील बहुतांश राज्यांतील भाजपविरोधी नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा लावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. अशा राज्यांचे दाखलेही विरोधकांनी दिले आहेत. आता त्याच राज्यांत जाऊन भाजप विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहे. या सात राज्यांमध्ये दिल्ली, पंजाब, जम्मू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहार यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातदेखील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. याविरोधात महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्षांची एकजूट झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण अधिक प्रखरतेने जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलंय.
विरोधकांच्या ‘या’ पत्राला उत्तर
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने कोणतेही पुरावे नसताना अटक केली. यापूर्वीदेखील महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांकडून आरेरावी सुरु आहे, असा आरोप विरोधकांकडून होतोय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, बीएसएसचे के चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, भगवंत मान, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, तेजस्वी यादव, जम्मूचे नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संयुक्त पत्र लिहिलं. भारत अजूनही लोकशाही देश असल्याच्या मताशी तुम्ही सहमत असाल अशी अपेक्षा आहे. पण विरोधी पक्षांतील नेत्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून आपण लोकशाहीतून निरंकुशतेकडे वाटचाल करतोय, असं दिसतंय. आपलं सरकार आल्यापासून 2014 पासून हे सत्र सुरु आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा, दिल्लीत या कारवाया सुरु आहेत, यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आता त्याला भाजप प्रत्युत्तर देणार आहे.