पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, रविवारपर्यंत सोशल मीडियातून संन्यास घेण्याचा विचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार असल्याचं ट्विट केलं (PM Modi Giving up social media) आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला (PM Modi social media) आहे. आज (2 मार्च) सोमवारी पंतप्रधान मोदींनी एक आश्चर्यकारक ट्विट केलं आहे. यात त्यांनी मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे असे त्यांनी लिहिले आहे.
येत्या रविवारी (8 मार्च) मी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबसह मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहे. याबाबत मी तुम्हाला माहिती लवकरच देईन असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
पंतप्रधान मोदी यांचे सोशल मीडियावर अंसख्य फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते सोशल मीडियाद्वारे जगभरातील लोकांच्या संपर्कात असतात.
त्यांचे ट्विटरवर 5 कोटी 33 लाख 70 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर ते स्वत: 2 हजार 373 जणांना फॉलो (PM Modi social media) करतात. तर फेसबूकवर 4 कोटी 45 लाख 98 हजार फॉलोवर्स आहेत.
पंतप्रधान मोदींच्या राजकीय यशाचे श्रेय सोशल मीडियाला दिले जाते. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जर पाहिला तर त्यांनी या काळात सोशल मीडियाला फार महत्त्व दिले आहे. ते सोशल मीडियावर फार सक्रीय असतात.
गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते सोशल मीडियावर फार लोकप्रिय होते. सोशल मीडियाद्वारे मोदींना मिळालेली प्रसिद्ध आणि यश पाहून अनेक नेत्यांनी स्वत: चे सोशल मीडिया अकाऊंट बनवले होते.